02 March 2021

News Flash

रंकाळय़ास पुन्हा भगदाड

कोल्हापूरचे जलवैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या तटबंदीला वर्षभराच्या कालावधीत एकदा नव्हे तर तीनदा भगदाड पडले असून हे रंकाळ्याप्रति महापालिका प्रशासनाकडून दाखवल्या जात असलेल्या नियोजन आणि बेशिस्तीला

| January 22, 2015 04:00 am

कोल्हापूरचे जलवैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या तटबंदीला वर्षभराच्या कालावधीत एकदा नव्हे तर तीनदा भगदाड पडले असून हे रंकाळ्याप्रति महापालिका प्रशासनाकडून दाखवल्या जात असलेल्या नियोजन आणि बेशिस्तीला पडलेले भगदाड आहे. लाखो रुपये खर्च करून तटबंदीची दुरुस्ती केली जात असली तरी तिचा दर्जा आणि कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे करवीरनगरीच्या जलवैभवाची कमालीची हेळसांड होत आहे. आता तर, मंगळवारी तिस-यांदा  पडलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे उघड झाल्याने रंकाळ्याची दुरवस्था कायम राहण्याची चिन्हे आहेत. रंकाळ्याच्या संवर्धनासाठी झगडणाऱ्या सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना घडलेला रंकाळा दिसण्याऐवजी बिघडलेला रंकाळाच पहावयास लागत आहे. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत ६ कोटींचा निधी प्राप्त होऊनही रंकाळ्याला वैभव प्राप्त होण्यात अडचणीच निर्माण झाल्या आहेत.
कोल्हापूर शहराचा उल्लेख तळ्यांचे शहर असा एके काळी केला जात होता. आता रंकाळा व लक्षतीर्थ तलाव वगळता इतर तलाव काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कोल्हापुरातील जलवैभव म्हणून रंकाळा तलावाकडे पाहिले जाते. करवीरनगरीत येणारे पर्यटक रंकाळ्याचे दर्शन आवर्जून घेतात. गेल्या दशकभराच्या कालावधीत मात्र रंकाळ्याची अधोगती होत आहे. एके काळी पिण्यासाठी रंकाळ्याचे पाणी वापरले जायचे. तथापि जलपर्णी, सांडपाण्याचा समावेश, मनमानी वापर यामुळे रंकाळ्याच्या पाण्याला दरुगध येऊ लागली. या प्रत्येक कारणासाठी उपाययोजना केल्या गेल्या मात्र बहुतांशी उपाययोजना कागदावरच राहिल्या. रंकाळ्याच्या संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यात आली. तटबंदीचा दर्जा निकृष्ट स्वरूपाचा असल्याने ती सतत कोसळत राहिली. गेल्या जानेवारीपासून ते यंदाच्या जानेवारीपर्यंत तब्बल तीनदा तटबंदीला भगदाड पडल्याने कामाच्या दर्जाच अधोरेखित झाला आहे.
गतवर्षी जानेवारीत तटबंदीला भगदाड पडल्यावर रंकाळाप्रेमींनी आवाज उठवला. त्याची दखल घेत प्रशासनाने भगदाडाची नव्याने उभारणी केली. पण सहा महिने होत नाही तोवर तटबंदी दुस-यांदा दुभंगली. या कामाचे इस्टिमेट करण्यात आले. तोवर आता मंगळवारी पुन्हा एकदा तटबंदी ढासळली आहे.  शिवाय आणखी तटबंदी कोसळण्याची शक्यताही रंकाळाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. तिस-यांदा रंकाळ्याच्या तटबंदीला भगदाड पडले असले तरी त्याची दुरुस्ती कधी होणार हा प्रश्न मात्र सतावत आहे. महापालिकेच्या तिजोरीमध्ये  सध्यातरी या कामासाठी निधी उपलब्ध नाही. पाटबंधारे विभागाकडून निधी हस्तांतरीत झाल्यानंतर नगरोत्थान योजनेतून काम करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. नुकत्याच बदली झालेल्या आयुक्त विजयामाला बिदरी यांनी आपल्या कोल्हापुरातील कारकिर्दीविषयी भाष्य करताना रंकाळ्याकडे विशेष लक्ष पुरविले असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांची पाट वळण्यापूर्वी रंकाळ्याची िभत कोसळल्याने या कामातील त्यांची आस्था आणि दर्जाही सिध्द झाला आहे. शिवाय बिदरी यांच्या जागी येणारे नवे आयुक्त पी.शिवशंकर यांच्यासमोर रंकाळा तलावाच्या एकूणच कामाबद्दल आवाहनही निर्माण केले आहे.
रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली हे उद्यान कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय सरोवर संवर्धनाचा ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला, पण तो नेमके कोठे आणि कसा वापरला गेला याचे स्पष्टीकरण रंकाळाप्रेमींना अद्यापही झालेले नाही. रंकाळा तलावाचे बकालपण दूर होताना दिसत नाही. यामुळे रंकाळाप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ  िहदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी १ फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. रंकाळ्याचे भगदाड दुरुस्तीच्या कामासाठी १०-१५ लाख रुपये खर्च झाले असताना ७० लाखांचा खर्च दाखवला जाऊन तलावाच्या नावाखाली खिशे भरण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दुरुस्तीसाठी पदाधिका-यांची पाहणी
रंकाळा तलावाची शालिनी पॅलेसकडील तटबंदी ढासळल्याच्या पाश्र्वभूमीवर आज महापालिकेचे स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अधिका-यांसमवेत पाहणी केली. स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी रंकाळा संरक्षक िभत बांधण्यासाठी १० दिवसांपूर्वी संबंधित अधिका-यांना एस्टिमेट सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार सदर कामी ७३ लाखाचे एस्टिमेट करण्यात आले आहे. पुन्हा संरक्षक िभत ढासळल्याने या एस्टिमेटमध्ये सुधारणा करून प्रस्ताव तातडीने स्थायी समितीसमोर सादर करण्याच्या सूचना या वेळी संबंधित अधिका-यांना दिल्या. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद तातडीने करून कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, नगरसेविका रेखा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, माजी नगरसेवक अजित राऊत, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 4:00 am

Web Title: representatives negligence to quality and work of rankala lake
टॅग : Kolhapur
Next Stories
1 मंगेशकरांचा वारसा चालविणारे कुणी दिसत नाही – आशा भोसले
2 चव्हाण दाम्पत्याचा खून घरगडय़ाने केल्याचे निष्पन्न
3 कर्जतचे सर्व क्षेत्र ओलिताखाली आणू
Just Now!
X