लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ ऊस आंदोलन नाही, तर जिल्ह्यातील किंवा मतदार संघातील प्रश्न सोडवण्याची नतिक जबाबदारी आहे, अशी टीका काँग्रेसचे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता शुक्रवारी येथे बोलताना केली.
हातकणंगले लोकसभेची उमेदवारी काँग्रेसचे आवाडे यांना कालच जाहीर झाली. या पाश्र्वभूमीवर त्यांनी आज जिल्हा काँग्रेसला भेट दिली. या वेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील होते.
आवाडे म्हणाले,की लोकसभेसाठी  कोल्हापूर व हातकणंगले दोनही मतदार संघ कॉंग्रेसच्या वाटय़ाला येण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र आघाडी धर्मानुसार कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेली. हातकणंगले मतदार संघ पूर्वीपासून राष्ट्रवादीच्या वाटय़ाला होता. यामुळे वरिष्ठ पातळीवरुन हा मतदार संघ काँग्रेसच्या वाटय़ाला आला तरच आपण निवडणूक लढवू अशी आपली भूमिका होती. ही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्यावरच आपण याठिकाणी उभारण्याचे घोषित केले. ५ ते ६ वर्षांपासून या मतदार संघात शेतकरी संघटनेचे वर्चस्व असल्याचे खोटे चित्र काही प्रवृत्तींनी तयार केले आहे. या प्रवृत्तींना थोपवण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. यासाठी दोनही कांॅग्रेसने एकदिलाने लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची जडणघडण सहकार चळवळीतून झाली असून ती टिकवण्यासाठीच आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी सांगीतले. दोनही जागांचे गांभीर्य लक्षात घेउन राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोनही जागा निवडून आणण्याची नतिक जबाबदारी असल्याचे सांगत कामाला लागण्याचे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी १५ वर्षांनंतर जिल्ह्यात पक्षाला उमेदवारी आली असून कोणत्याही परिस्थीतीत ही जागा निवडून आणून मिळालेल्या संधीचे सोन करु अशी ग्वाही दिली. देशात सध्या हजारो माणसांची कत्तल करणाऱ्या हिटलरशाही उमेदवाराचे वारे असून तथापि या प्रवृत्तीला पराभूत करुन राहुल गांधी यांच्याकडे देशाची सूत्रे सोपवायची आहेत.  यासाठी आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी राहून निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. २ ते ३ दिवसात आजी माजी आमदार, १२ तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी या सर्वाचा मेळावा घेणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी  स्वागत केले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार प्रसाद खोबरे यांनी आभार मानले. बठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, उपमहापौर मोहन गोंजारे, जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष िहदूराव चौगुले, गोकुळचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेविका संध्या घोटणे, लीला धुमाळ, नगरसेवक श्रीकांत बनछोडे, रवी मोरे, गुलाबराव घोरपडे, सरलाताई पाटील, बाळासाहेब सरनाईक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.