भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखंड वैष्णवांचे दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विशेष म्हणजे सावळा विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या अंगावर तिरंगी रंगाचा शेला देखील परिधान करण्यात आला होता. संपूर्ण सजावट पुणे येथील मोरया प्रतिष्ठानचे सचिन चव्हाण यांनी केली. यासाठी झेंडू, शेवंती, स्प्रिंगर, कार्नेशियन अशा विविध प्रकारच्या तब्बल 146 किलो फुलांचा वापर करण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. या फुलांच्या सजावटीत सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत होते.