६७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलीस विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे, आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव, पोलीस अधीक्षक संजय शिंदे, महापालिका आयुक्त डॉं. अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते.
परेड कमांडर विजय कुमार चव्हाण, सेकंड परेड कमांडर रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. भोसला मिलेटरी स्कूलचे प्रथमच सहभाग घेणारे आर्मी विंग मुलींचे पथक संचलनाचे विशेष आकर्षण ठरले.
संचलनाच्यावेळी चित्र रथातून सामाजिक जागृतीचे संदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत संदेश देणारा नाशिक महानगरपालिकेचा चित्ररथ, जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक यांचा लेक वाचवा, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील १०८ क्रमांक रुग्णवाहिका, महिला बालविकासचे चाईल्ड लाईनचे १०९८ वाहन, अग्निशामक दलाचे हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि वॉटर टेंडर वाहन या संचलनाचे आकर्षण होते. आदिवासी विभागातर्फे नृत्य पथकाने संचलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिलेटरी स्कूल, होरायझन स्कुल, वाघ गुरुजी शाळेचे स्काऊट-गाईड पथक, बँड पथक, भोसला मिलेटरी स्कूल घोडदल, डॉग युनिट वाहन, जलत प्रतिसाद पथक, फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन वाहन, वन विभाग अॅनिमल रेस्क्यु वाहन आदी पथकांनी सहभाग घेतला. या वेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.