News Flash

स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र महाबळेश्वरमध्ये उभारणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पर्यटन विकासाचा आढावा

महाबळेश्वर पर्यटन विकासासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीला विविध खात्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया - संजय दस्तुरे)

महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मधासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्ट्रॉबेरी आणि त्यासारख्या फळांवर आपल्याकडे अद्याप सखोल संशोधन झालेले नाही. ते झाल्यास त्याच्या लागवडीपासून ते उत्पादनातही मोठा फरक पडेल. यासाठी महाबळेश्वरमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

राजभवन येथील दरबार हॉलमध्ये महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ठाकरे बोलत होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ. बेन क्लेमंट, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भगत, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील यांची उपस्थिती होते.

ठाकरे म्हणाले, की या फळांबाबत संशोधन केंद्र सुरू झाल्यास त्याचा येथील स्थानिक उत्पादकांना फायदा होईल.

स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पादन वाढेल. तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पीक घेता येऊ  शकेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटनस्थळांचा देखील विकास केला तर महाबळेश्वर येथे मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या विकेंद्रित होऊन प्रतापगड, तापोळा यांसारखी ठिकाणंही मोठय़ा प्रमाणात कशी विकसित होतील यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, नगरपरिषद आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

महाबळेश्वर आणि पांचगणी येथील जे विकास प्रकल्प आहेत, त्याचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवावेत, दोन्ही पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबध्द नियोजन करावे त्या प्रकल्पाना मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की महाबळेश्वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येतात. याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविध भाषिक पर्यटकांना त्याचा चांगला फायदा होईल.

पर्यावरणपूरक वाहतुकीचा विचार

महाबळेश्वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या असते. साहजिकच वाहनांची समस्या मोठी आहे. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून ‘बॅटरी’ किंवा इलेक्ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करून पर्यावरणपूरक वाहतूक निर्माण करता येईल का, हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:54 am

Web Title: research center on strawberries will be set up in mahabaleshwar abn 97
Next Stories
1 Budget 2020 : महाराष्ट्राचा अपेक्षाभंग आणि देशवासीयांची निराशा
2 Budget 2020 : राज्यांचा महसुली वाटा ४१ टक्क्य़ांवर
3 कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही – शरद पवार
Just Now!
X