|| राखी चव्हाण

प्रदूषणाच्या समस्येबाबत डॉ. उदय भवाळकर यांचे संशोधन दुर्लक्षित

जागतिक तापमानवाढ हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जमीन, पाणी आणि हवा हे निसर्गातील तिन्ही घटक प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. या प्रदूषणावर मात करण्यासाठी जगभरात पॅरिस करार आणि तत्सम उपायांचा अवलंब केला जात आहे. १९७३ साली आयआयटी झालेल्या संशोधकाने ‘बायोसॅनिटायझर’ या नॅनो तंत्रज्ञानाचा अफलातून आविष्कार समोर आणला. मात्र विदेशी तंत्रज्ञानाच्या मागे धावणाऱ्या भारतात, या नैसर्गिक उत्प्रेरकाची अजूनही म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.

जंगल तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया औद्योगिकीकरणामुळे बंद झाली. पर्यायाने शुद्ध ऑक्सिजन तयार होणे बंद झाले आणि पर्यावरण प्रदूषणात रूपांतरित झाले. जागतिक पातळीवर तापमानवाढीचा प्रभाव तीव्रतेने जाणवत असताना गॅट कराराअंतर्गत प्रगत राष्ट्रांना आता कार्बन ट्रेडिंगची आठवण आली. जागतिकदृष्टय़ा त्यासाठीचे कायदे तयार होत आहे. मात्र ४० वर्षांपासून संशोधनकार्यात असलेल्या डॉ. उदय भवाळकर यांनी ‘बायोसॅनिटायझर’च्या रूपाने एक नैसर्गिक उत्प्रेरक तयार केले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यास अजूनपर्यंत कुणालाही सुचले नाही. सर्वच प्रकारच्या जलाशयातील पाण्यात मोठय़ा प्रमाणात नायट्रेट्स, सॉल्ट्स असे अनेक रासायनिक घटक मिसळलेले आहेत. बायोसॅनिटायझर हे नैसर्गिक उत्प्रेरक त्या पाण्यात टाकल्यास पाणी जिवंत होते. त्यात डासांची अंडी तयार होत नाही, शेवाळं तयार होत नाही. पाण्यातील क्षार वेगळे करण्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही, तर क्षार आपोआप कमी होतात. वाहनांच्या टँकमध्ये या उत्प्रेरकाला टाकल्यास त्या माध्यमातून ऑक्सिजन मिळाल्यामुळे वाहनांच्या अ‍ॅव्हरेजेसमध्ये दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ होते. वाहनातून निघणाऱ्या धुरातून कार्बनडाय ऑक्साइड व नायट्रेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तापमानवाढीवर मात करता येते. हवेतील प्रदूषणासाठी वाहनातून निघणारे धूर कारणीभूत आहेत. हे नैसर्गिक उत्प्रेरक उद्योगात वापरल्याने रसायनामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. शेतीच्या प्रदूषणावरही ते तेवढेच गुणकारी आहे. शेतातील विहिरीत, जलाशयात तसेच पाण्याचे पाट यातून त्याचा वापर केल्यामुळे अशुद्ध पाणी शुद्ध होते. त्या माध्यमातून शेतातील जमिनीत साधारणत: एक ते दीड वर्षांत जमिनीची पूर्णपणे सुधारणा होते. बायोसॅनिटायझरच्या पाण्यामुळे जमिनीची क्षारता कमी होते. गांडुळे जमिनीत तयार झाल्याने नैसर्गिकरीत्या पावसाचे पाणी मुरायला लागते आणि त्यामुळे पाण्याची समस्या सुटते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वेगळी फवारणी व त्यासाठीचा खर्च करावा लागत नाही. जमीन तीव्र गतीने सेंद्रिय होते. जमिनीत गांडुळे व विविध जैविक संपदा निर्माण होते.

प्रदूषणावर मात करण्यासाठी..

या प्रकारच्या बायोसॅनिटायझरचा उपयोग नागपूर, नाशिक, निफाड, पुणे, मुंबई, कोलकाता या शहरांमध्ये तसेच तमिळनाडू, आसाम, गुजरातसह अनेक राज्यांत आणि विदेशातदेखील करण्यात येत आहे. जागतिक तापमान वाढ हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. आयआयटी मुंबईचे रासायनिक अभियंता डॉ. उदय भवाळकर यांनी हवा, पाणी आणि जमिनीच्या प्रदूषणावर मार्ग शोधून काढला आहे. प्रदूषणांच्या समस्येचे मूळ असणारे नायट्रेस त्यांनी शोधून काढले. प्रदूषणासाठी कारणीभूत केवळ कार्बन आणि संबंधित घटकांचे संशोधन न करता वेगळ्या पद्धतीने त्याचे विभाजन करून समस्येचे समाधान शोधले.

चार दशके संशोधनात

डॉ. उदय भवाळकर हे १९७३ ला आयआयटी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून ते संशोधनकार्यात आहेत. त्यांनी तयार केलेले हे बायोसॅनिटायझर ‘क्रिस्टल’ रूपात आहेत. हे एक नॅनो तंत्रज्ञान असून कोणत्याही द्रवपदार्थात ते टाकले तर प्रदूषित घटक नष्ट करतात. त्यातील घटक जंगलासारखे ऑक्सिजन तयार करतात. अमेरिकेचे आणि भारताचे प्रत्येकी दोन पेटंट त्याला मिळाले आहे. हे नॅनो तंत्रज्ञान असल्याने त्याचा फारसा प्रसार नाही. आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी तयार केलेले हे तंत्र वैशिष्ठय़पूर्ण आहे. विविध पातळ्यांवर त्याला पारितोषिके मिळाली आहेत. या बायोसॅनिटायझरमुळे हवा, पाणी आणि जमीन शुद्ध होईल. वातावरणातील व्हायरस कमी होतील आणि पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम भारत पुढच्या पिढीच्या हातात देऊन त्यांचे जीवन नैसर्गिकदृष्टय़ा समृद्ध होईल, असा विश्वास डॉ. भवाळकर यांच्यासोबत कार्य करणारे रेनवॉटर हार्वेस्टिंगतज्ज्ञ प्रा. अरविंद कडबे म्हणाले.