जालना शहराजवळ दावलवाडी येथे चाचणी

डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे आजार वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती कमी होण्याच्या संदर्भात सध्या जालना शहराजवळील दावलवाडी येथे संशोधन आणि चाचणी सुरू आहे. बाहय़ वातावरणात परंतु पिंजऱ्यात बंदिस्त डासांवर सध्या या संदर्भात प्रयोग सुरू आहे. अशा प्रकारच्या नर डासांची निर्मिती करायची, की त्यांचा स्थानिक मादी डासाशी संबंध आला तर होणारी पैदास उपजण्याआधीच मृत्युमुखी पडावी, असे या संशोधनाचे उद्दिष्ट आहे. बाहय़ वातावरणात परंतु बंदिस्त क्षेत्रात या संदर्भात चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.

नर डास माणसाला चावत नाही आणि त्यामुळे त्याच्यापासून रोगाचा फैलाव होत नाही. डेंग्यू, चिकुनगुन्या तसेच झायकासारख्या रोगाच्या प्रसारास मादी डास कारणीभूत असतो. नर डास रक्तपिपासू नसतो. मादी डास मात्र रक्तापर्यंत पोहोचल्याने डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे आजार पसरतात. त्यामुळे असे आजार पसरवणाऱ्या डासांचा फैलाव रोखण्यास मदत करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येत आहे. त्यासाठी जीबीआयटी अर्थात गंगाभीषण भिकूलाल इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग लिमिटेड आणि ऑक्सिटेक अमेरिकन कंपनीने भागीदारी तत्त्वावर भारतात संशोधन सुरू केलेले आहे.

जीबीआयटी आणि जालना शहरातील प्रसिद्ध महिको बियाणे कंपनीचा जवळचा संबंध आहे. महिकोचे अध्यक्ष बद्रिनारायण बारवाले हेच जीबीआयटीचेही अध्यक्ष आहे. त्यामुळे जालना शहराजवळ दावलवाडी येथे असलेल्या महिकोच्या केंद्रात डासांच्या संदर्भात संशोधन सध्या सुरू आहे. डासाच्या प्रसारास नियंत्रण करू शकणारे म्हणजे ‘उपयोगी एडिस अॅजेप्टी’ निर्माण व्हावेत हा या संशोधनाचा हेतू आहे. ‘उपयोगी एडिस अॅजेप्टी’ नर डास चावत नसल्याने त्यांच्यापासून रोगाचा प्रसार होत नाही. हे नर डास जेव्हा स्थानिक मादी डासाशी संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यापासून होणारी पैदास जन्मत:च मृत्युमुखी पडते. त्यामुळे डासांची संख्या कमी होते.

सध्या अशा डासांच्या निर्मितीसंदर्भात दावलवाडी येथे मर्यादित स्वरूपाचा अभ्यास सुरू आहे. बाहय़ वातावरणातील पिंजऱ्यात आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन हे संशोधन सुरू आहे. खुल्या क्षेत्रात ही चाचणी घेण्यासाठी केंद्र सरकारचे संबंधित नियामक मंडळ आणि जेनेटिक इंजिनिअरिंग अॅप्रूव्हल कमिटीच्या परवानगीची आवश्यकता लागणार आहे. जीबीआयटीच्या दाव्यानुसार ब्राझीलसह अन्य काही देशांमध्ये झालेल्या चाचण्यांत या प्रयोगाची उपयोगिता स्पष्ट झालेली आहे.

जीबीआयटीशी संबंधित महिकोचे नाव जनुकीय अभियांत्रिकी शाखेतील प्रगतीच्या आधारे बीटी कापूस बियाण्यांच्या उत्पादनामुळे सर्वदूर परिचित आहे. साधारणत: मागील पंधरा वर्षांपूर्वी कापूस पिकावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बी.टी. पावडरची फवारणी करत असत. बी.टी. अर्थात बॅसिलयस युरिन्जिएन्सीस हा मातीत सापडणारा सामान्य जीवाणू असून त्याचा शोध ५०-५५ वर्षांपूर्वीचा आहे. ज्या जनुकामुळे बी.टी. पावडर बोंडअळी नष्ट करते ते जनूकच बियाण्यांत घालण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याने कापसाच्या पिकातच बोंडअळीच्या विरुद्ध जगण्याची क्षमता निर्माण झाली. जैवतंत्रज्ञानावर आधारित या कापसाच्या तीन जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्याची परवानगी महिकोस २००२ मध्ये केंद्र सरकारने दिली होती. बोंडअळी नियंत्रणात आणण्याच्या या प्रयोगानंतर महिकोशी संबंधित जीबीआयटी ही कंपनी आता डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजाराचा प्रसार करणाऱ्या मादी डासांची उत्पत्ती मर्यादित करण्यासाठी संशोधन करीत आहे. डासांची उत्पत्तीच कमी झाली तर त्यामुळे त्यांच्यापासून फैलावणाऱ्या रोगांवर काही प्रमाणावर नियंत्रण येऊ शकेल, यासाठी हे संशोधन आहे.

जीबीआयटीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दासगुप्ता यांनी या संदर्भात सांगितले, की बाहय़ वातावरणात, परंतु बंदिस्त क्षेत्रात घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणेसमोर मांडण्यात येणार आहेत. खुल्या क्षेत्रात चाचणी घेण्याचा पुढचा टप्पा असेल. त्यासाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार काम करावे लागणार आहे.