वाढत्या लोकसंख्येमुळे बोईसरमध्ये ग्रामपंचायतीऐवजी नगर परिषद स्थापन करण्याची आश्वासने राज्यकर्त्यांकडून अनेकदा देण्यात आली. मात्र अजूनही नगर परिषद होण्याचे घोंगडे भिजत असल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून याबाबतच्या फेरआरक्षणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुन्हा बोईसरला शहराचा दर्जा मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर बोईसरचा तिढा सुटेल, अशा आशा बोईसरच्या रहिवाशांच्या होत्या; परंतु राजकीय उदासीनता व जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घातलेला खोडा यामुळे बोईसरचा तिढा तसाच कायम राहिला आहे. बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रांत दोन जिल्हा परिषदा व चार पंचायत समिती सदस्य असल्याने नगर परिषद झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती बरखास्त होणार होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला सत्ता उपभोगता यावी यासाठी स्थायी समितीच्या सभेत विरोध दर्शविला होता. जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व्हावा, अशी सदस्यांची भूमिका होती. मात्र आता कार्यकाळ संपत आला असताना याअगोदर बोईसर नगर परिषदबाबत अनुकूल ठराव घेणे गरजेचे होते; परंतु बोईसरच्या स्थानिक सदस्यांनीही याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नसल्याने बोईसरचा विषय जिल्हा स्तरावरच रेंगाळत राहिला आहे.

बोईसर ही ‘अ’ वर्गाची नगर परिषद व्हावी तसेच यामध्ये औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या आठ गावांचा समावेश व्हावा यासाठी २०१३ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत राज्य शासनाने अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पालघर जिल्हानिर्मितीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोईसर नगर परिषदेत होणे आवश्यक असल्याबाबत अनुकूल अहवाल शासनाला सादर केला होता; परंतु जिल्हा परिषदेने २० जुलै २०१६ रोजी नगर परिषदेला विरोध असल्याचा ठराव शासनाला पाठविल्याने बोईसरच्या विकासाला खीळ बसली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पालघर जिल्ह्य़ात घेतलेल्या अनेक जाहीर सभेत बोईसर नगर परिषद लवकरात लवकर केली जाईल, अशी आश्वासने दिली होती. मात्र राज्य सरकारची पाच वष्रे उलटल्यानंतरही बोईसरचा गाडा पुढे जाऊ शकला नाही.

शहर भासवून लूट

बोईसर शहर असल्याचे भासवून बोईसरमध्ये मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. नकाशावर सुंदर रस्ते, सुविधा दाखवल्या जात आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. बोईसरमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे जोमाने उभी राहत असून या ठिकाणीही नागरिकांची फसवणूक होत आहे.

अनेक समस्या

मुख्य रस्त्यालगत टोलेजंग उभ्या राहणाऱ्या इमारती पाहून बोईसर शहर असल्याचा भास होतो. मात्र आजही बोईसरच्या मुख्य रस्त्यावर उकिरडे पाहायला मिळत असून सुसज्ज रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, बगिचे, मैदाने, पथदिवे, सांडपाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था अशा अनेक सुविधांची कमतरता बोईसरमध्ये पाहावयास मिळते. यातच महत्त्वाचे म्हणजे बोईसरमध्ये एकही बगिचा किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानही नाही. विकासकांनी मैदानासाठी राखीव ठेवलेले भूखंडही गिळंकृत केल्याने या भागात जागाच शिल्लक राहिलेली नाही.