सध्या संपूर्ण देश हा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. देशातील तुलनेने छोट्या राज्यांनी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून करोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही याची काळजी घेतली होती. गोवा हे अशाच राज्यांपैकी एक राज्य होतं, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा ग्रीन झोनमध्ये गेल्याचंही जाहीर केलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्याचे भाजपा नेते आणि मंत्री मायकल लोबो यांनी महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे केली आहे.

“गोवा याआधी ग्रीन झोनमध्ये होतं, संपूर्ण राज्याचा विचार केला तर आम्ही अजुनही ग्रीन झोनमध्येच आहोत. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसांत दोन-तीन लोकं दिल्लीवरुन राज्यात आली होती, त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. सध्या राज्यात जे करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत, त्यातील बहुतांश हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील लोकांना राज्यात प्रवेश देऊ नका अशी मागणी केली आहे.” लोबो ANI वृत्तसंस्थेशी बोलत होते.

गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने करोना चाचणी करुन घेणं बंधनकारक करावं अशीही मागणी लोबो यांनी केली आहे. “महाराष्ट्रातील लोकांवर बंदी घाला याचा अर्थ असा नाही की मी तिकडच्या लोकांविरोधात आहे. परंतू सध्या सर्वात जास्त करोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे पुढील काही कालावधीसाठी ही बंदी घालण्यात यावी. रस्ते, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कोणत्याच प्रकारे महाराष्ट्रातील व्यक्तीला गोव्यात काही दिवसांसाठी प्रवेश नाकारला पाहिजे.” विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा पदभार असलेल्या लोबो यांनी आपलं मत मांडलं.

५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. पावसाळ्यात या विषाणूचा प्रादूर्भाव कसा होईल याची कोणालाही कल्पना नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना राज्यात बंदी केल्यास गोव्यातली परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते, असं लोबो म्हणाले. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने सर्व परप्रांतीय कर्मचाऱ्यांना आपल्या घरी परतण्याची परवानगी दिली आहे.