मराठय़ांना आरक्षण, हा महाराष्ट्रात मुळात आंदोलनाचा विषयच राहिलेला नाही. मराठय़ांना आरक्षण मिळावे, यासाठी नारायण राणे यांनी जरूर प्रयत्न करावे, पण त्यास महाराष्ट्रात काडीचाही प्रतिसाद मिळणार नाही, असा प्रतिटोला रिपाइंचे खासदार रामदास आठवले यांनी येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.
आरक्षणास विरोध असलेल्यांनाही आता आरक्षणाचे महत्त्व पटत असून ही चांगली बाब आहे. आर्थिकदृष्टय़ा मागासलेले सर्वच जातींमध्ये असल्याने त्यांना आरक्षण दिले जावे, अशी रिपाइंची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मुळात आतापर्यंत बरेच मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, पण ते मराठय़ांना आरक्षण मिळवून देऊ शकलेले नाहीत. आता मराठा आरक्षणाची मागणी नारायण राणे यांनी केली. मराठे राजकारणासाठी एकत्र येतील, पण आरक्षणासाठी मात्र नाही. पटेल समाजात आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना आरक्षण दिले पाहिजे, असे रिपाइंचे मत असून गुजरातमधील त्यांच्या आंदोलनाला रिपाइंचा पाठिंबाच आहे.
ना हिंदूंची लोकसंख्या कमी झाली ना मुस्लिमांची फार वाढली. बौद्धांची संख्या देशात मोठी असूनही कमी दाखविण्यात आली आहे. सर्वेक्षण झाले तेव्हा बौद्ध धर्मातर केलेल्यांनी तशी नोंद केली नाही, हे त्यामागील कारण आहे. पुढील जनगणनेच्या वेळी रिपाइं या दृष्टीने प्रयत्न करेल. शिर्डी व सिद्धिविनायक संस्थानला ‘अ’ दर्जा शासनाने दिला, ही चांगली बाब आहे. दीक्षाभूमीला ४० ते ५० लाख लोक भेट देतात. दीक्षाभूमीलाही तीर्थस्थळ व पर्यटनाचा ‘अ’ दर्जा द्या, तसेच समुद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उंच पुतळा बसवावा, आदी मागण्या मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे. राज्यात नव्हे, तर केंद्रात मंत्रिपद द्या, अशी मागणी गडकरी व मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.