पालघर जिल्ह्य़ात करोना संक्रमण वाढण्याची भीती

पालघर : राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सेवा सुरू  ठेवण्याची अनुमती असली तरी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतचे बहुतांश हॉटेल रात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. दिवसा पार्सल आणि रात्री ग्राहकांची झुंबड असे चित्र काही हॉटेलांमधून दिसून येत आहे. त्यामुळे  पुन्हा नव्याने करोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

मुंबई व गुजरात राज्यामध्ये असलेल्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सोळा हजारांहून अधिक करोनारुग्ण आढळले होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात  दररोज ८०० ते ९०० रुग्ण वाढ होत होती. सध्या टाळेबंदीचा परिणाम होऊन रुग्णवाढ २०० ते २५०च्या जवळपास देऊन ठेपली आहे.  करोना नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत राज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांना फक्त पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असतानाही महामार्गावरील काही हॉटेलचालक दिवसा पार्सल सुविधा आणि रात्रीच्या वेळी हॉटेल सुरू ठेवत असल्याचे आढळून आले आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा पंधरा ते सतरा मोठी हॉटेल्स रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने सुरू असतात. या ठिकाणाहून दर तासाला पोलिसांचे गस्ती पथक फेरी मारत असले तरी आजवर कोणत्याही हॉटेलचालकावर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

मनोरजवळील एका हॉटेल व्यावसायिकाचा अलीकडेच करोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून परराज्यातील चालकांच्या खानपान सेवेत रुजू असलेल्या काही स्थानिक कामगारांना या आजाराचे नव्याने संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे.  गुजरात, राजस्थान, दिल्ली व इतर राज्यांतून ट्रकचालक रात्रीच्या वेळी जेवण्यासाठी येथील हॉटेलमध्ये येत असतात. त्यांना मागच्या दरवाजाने प्रवेश दिला जातो. या प्रकारामुळे पुन्हा नव्याने करोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता महामार्गालगत असणाऱ्या हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा पुरवली जाईल, याकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले.

दरम्यान, एकीकडे सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असताना राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांनी अभय दिल्याचे आरोप होत आहेत.

मागच्या दरवाज्याने प्रवेश

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बहुतांश हॉटेलच्या पुढील शटर बंद ठेवण्यात येते. तसेच हॉटेलसमोरील जागेत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जेवणासाठी आल्यास हॉटेलबाहेर बसणाऱ्या पहारेकऱ्याकडून त्यांना हॉटेल बंद असल्याचे सांगण्यात येते. मात्र ट्रकचालकांना त्यांचे वाहन उभे करण्याची मुभा देऊन त्यांना हॉटेलमध्ये असलेल्या वातानुकूलित रूमच्या दुसऱ्या दरवाजातून किंवा हॉटेलच्या मागे असलेल्या दरवाजातून प्रवेश दिला जातो. मनोर परिसरातील अधिकांश हॉटेल रात्री नऊ ते अकरामध्ये तुडुंब भरलेले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात येते. अशाच पद्धतीने तलासरी ते विरारदरम्यान महामार्गालगतची अनेक हॉटेलेदेखील सुरू असल्याचे  सांगण्यात येते.