मराठा आरक्षणाबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या सहा महिन्यांची मुदत पूर्ण होण्यास दोन महिने बाकी आहेत. तोपर्यंत कायदा हातात न घेता संयम ठेवावा. या लढाईत बहुजन समाजातील इतर घटकांना सोबत घेतल्यास अपेक्षित यश मिळू शकते, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजीमहाराज व शाहूमहाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
येथील मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने गोंधवणी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष शांताराम कुंजर, छावाचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर टाळकुटे आदी उपस्थित होते.
छत्रपती भोसले म्हणाले, राणे समितीला दूषणे देण्याऐवजी त्यांचे कौतुक केले पाहिजे. गेल्या चार महिन्यांपासून समितीचे सदस्य राज्याबाहेर तामिळनाडू, आंध्र प्रदेशात जाऊन अतिरिक्त आरक्षणाचा अभ्यास करीत आहेत. त्याचा फायदा मराठा आरक्षणालाच होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद तर ३० ऑक्टोबर रोजी नाशिक येथे येणाऱ्या नारायण राणे समितीसमोर मोठय़ा प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सज्ज रहा. त्यात बामसेफसारख्या संघटना व बहुजन समाजातील इतर घटकांना बरोबर घ्या, त्यांची ताकद वापरा, असे आवाहन त्यांनी केले.
शाहूमहाराजांनी १९०२ साली बहुजन समाजास ५० टक्केआरक्षण लागू केले. त्या वेळी त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. सध्या मराठा समाजातील अवघी १० टक्के लोकसंख्या आर्थिकदृष्टय़ा सधन आहेत. उर्वरित ९० टक्के मराठे भीषण अवस्थेत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या आत्महत्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही मराठय़ांचीच होती. हे आरक्षण त्यांच्यासाठी हवे आहे, हे पटवून देण्यासाठी व आरक्षण मिळविण्यासाठी कायदा हातात घेणे हा पर्याय नाही.
शिवनेरीवर मुख्यमंत्र्याच्या हेलिकॅप्टरवर दगडफेक करण्यात आली. त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. मात्र अरक्षणाच्या मुद्यावर राज्यात बसेसवर, वाहनांवर होणारी दगडफेक, जाळपोळ यांचे समर्थन कदापि करणार नाही. गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्याकडे येण्यापेक्षा कायदाच हातात घेऊ नका. संयमाने लढा द्या. तरच यश मिळेल असे म्हणत छत्रपती भोसले यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना फटकारले.
प्रास्ताविक नारायण तांबे यांनी केले. या वेळी शरद निमसे, कृषिराज टकले आदींची भाषणे झाली. सुभाष जंगले, दत्तात्रय कांदे, बाळासाहेब दिघे, जगदीश लांडे, रमेश मकासरे, विनोद राऊत आदी उपस्थित होते. बबन लबडे यांनी आभार मानले