शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक कार्यक्रम बंद; व्यावसायिकांना वेळेच्या मर्यादा

पालघर: पालघर जिल्ह्यत करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यतील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध ५ एप्रिलपासून अमलात येणार आहेत.

निर्बंधामध्ये जिल्ह्यतील सर्व शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. दहावी व बारावीतील मुलांच्या पालकांच्या संमतीने ऐच्छिक वर्ग घेता येतील. राज्य, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावरील परीक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेण्याची परवानगी राहील.  अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने सकाळी ७ ते सायं. ७ पर्यंत सुरू राहतील.

लग्न व इतर समारंभ १५ एप्रिलपर्यंत पूर्वनियोजित असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस ठाण्याकडून परवानगी घेण्याचे बंधनकारक राहील.  कार्यक्रम सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत घेण्यास परवानगी राहील.  नंतर  समारंभांच्या आयोजनास पुढील आदेशापर्यंत बंदी राहील. खाद्यगृह, परमिट रूम, बार ही सकाळी ७ ते रात्री ९, घरपोच खाद्यसेवा  व वितरण कक्ष रात्री १० तर  व्यायामशाळा, क्रीडा संकुल, खेळाची मैदान आदी  वैयक्तिक सरावासाठी सुरू असतील,  हातगाडी, दुकाने सकाळी ७ ते रात्री ८,  धार्मिक स्थळे सायं.७ पर्यंत सुरू राहतील.  सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम उत्सव समारंभ पूर्णपणे बंद राहतील. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.  दिवसाआड  रिक्षा, सिनेमागृह, हॉटेल, उपाहारगृहात पन्नास टक्के उपस्थिती, असे आदेशित करण्यात आले आहे. शॉपिंग मॉल सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू होतील.

अंत्यविधी कार्यक्रमास २० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहता कामा नये, असे सूचित करण्यात आले आहे.

कारवाईचा इशारा

आर टी पी सी आर चाचणी झाली आहे ,असा व्यक्तींनीच चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत गृहविलगीकरण करणे आवश्यक राहील.  तसेच अशा व्यक्तींच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का असणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.