अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटर परिसरातील बांधकामांवर निर्बंध
पालघर : विकास, सुरक्षा आणि नियंत्रणाच्या दृष्टीने तारापूर अणु ऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटर परिसराचे सीमांकन करण्यात येणार आहे. त्यानुसार परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाढीव बांधकामांना परवानगी घेणे आवश्यक होणार आहे. तसेच परिसरात उभ्या असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
देलवाडी येथील रहिवासी जितेंद्र राऊळ यांनी या बांधकामांविरुद्ध तक्रारी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या दालनात ७ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेच प्रकल्प परिसरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विना परवानगी बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना नाना पाटोळे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी यांनी पालघरच्या तहसीलदारांना या आदेशांच्या अनुषंगाने कारवाई करण्याची सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालघर तहसीलदारांनी नगररचना विभागाला अणु उर्जा केंद्रापासून पाच किलोमीटर अंतराचे परिघाचे तातडीने सीमांकन करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. ग्रामसेवक तसेच तलाठी यांच्याकडून शासकीय व खासगी जमिनीवर उभ्या असलेल्या अनधिकृत बांधकामांचा तपशील गोळा करण्याचे सूचित केले आहे.
अणुऊर्जा केंद्रापासून पाच किलोमीटर क्षेत्रावर असलेल्या नैसर्गिक वाढीच्या ‘स्टरीलाइज झोन‘ मध्ये उभ्या असलेल्या बेकायदा बांधकामांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच ते निष्कासित करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय जमिनीवर असलेल्या बांधकामे जमीनदोस्त करण्याच्या दृष्टीने हालचालीला वेग आला आहे. या पट्ट्यात असलेल्या न्यायप्रविष्ट जागांसंदर्भात असलेले अपील अर्जांबाबत महसूल अधिकाऱ्यांनी महिन्याभराच्या आत निर्णय घेण्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. येत्या काही दिवसात अणुऊर्जा केंद्राच्या पाच किलोमीटर परिघातील बेकायदा बांधकामविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाईल असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
सीमांकन न झाल्याने अतिक्रमण
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अपघात झाल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटर परिसराचे सीमांकन करण्याचे सूचित करण्यात आले होते. प्रकल्पाच्या प्रबंधक यांनी सन २०१९ मध्ये नगररचना विभागाला अणुऊर्जा प्रकल्प १ व २ तसेच प्रकल्प ३ व ४ यांच्या चिमणीपासून पाच किलोमीटर परिघाचे सीमांकन करून चिन्हित नकाशे प्रसिद्ध करण्यास सांगितले होते. परंतु ठाणे जिल्हा प्रशासनाने व ऑगस्ट २०१४ नंतर पालघर जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. परिणामी या भागातील अनेक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत पातळीवर बनावट घरपट्ट्या आकारणी करून आपले घर व इमारती उभारण्याचा प्रयत्न काही विकासकांनी केल्याचे पुढे येत आहे. अशा विनापरवानगी बांधकामांवर आगामी काळात कारवाई करण्याचे संकेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 28, 2021 1:19 am