जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्या बंद करण्याचा विचार

पालघर : पालघर जिल्ह्यातील सर्व धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांनी येण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. जिल्ह्यात जमावबंदी आणि त्यासंदर्भात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या जत्रा, यात्रा तसेच आठवडा बाजारांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे.

त्याच वेळी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने काही उद्योग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत शासकीय यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यात असलेली सर्व तीर्थस्थळे, प्रार्थनास्थळे तसेच पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीवर रोख लावण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाआहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील यात्रा व जत्रा आयोजित  करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. एप्रिलमधील यात्रासंदर्भात मार्च महिन्याच्या अखेरीस निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जिल्ह्यातील मॉल बंद करण्यात आले असून त्याचप्रमाणे विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडाबाजारांवरही बंदी आणण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व गावांत जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन जीवनात लागणारी फळे- भाजीपाला, औषधे, किराणा दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे खानपान व्यवस्थेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये अशी वयस्था ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्यस्थितीत नागरिकांनी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आगामी काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी करोना विषाणू विषयीची व्याप्ती ओळखून स्वयंस्फूर्तीने अशा समारंभांमध्ये सहभागी न होण्याचे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले. त्याचप्रमाणे ज्यांना शक्य झाल्यास अशांनी लग्न समारंभ पुढे करण्याचे आव्हान करत जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या सभा, बैठका, प्रशिक्षण घेण्यात येऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. प्रारूप सागरी किनारा व्यवस्थापन आराखडय़ाची संदर्भातील पालघर येथे २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

* जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना ‘करोना’आजाराच्या रुग्णाशी कसे सामोरे जावे आणि स्वत:ची कोणत्याप्रकारे दक्षता घ्यावी या विषयी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

* जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे कार्यालय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ रद्द करण्यात आली आहे.  नागरिकांनी तक्रारी ई-मेलद्वारे वा दूरध्वनी करून संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* पालघर जिल्ह्यात दोन लाख २८ हजार कामगार औद्य्ोगिक क्षेत्रात काम करीत आहेत. या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगारांची गर्दी असते अशा काही उद्योग बंद करण्याच्या दृष्टीने औद्य्ोगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच कामगार विभागाला सूची बनवण्याचे सांगण्यात आले आहे.

* उद्योग, उपाहारगृह, दुकाने सुरू ठेवणे आवश्यक असेल त्या ठिकाणी दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘कापडी आवरणांची विल्हेवाट लावा’

करोना संभाव्य रुग्णांच्या विलगीकरणासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या आणि  वापरण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीं निवडण्यात आल्या आहेत. करोनाने बाधित झालेल्या रुग्णांना घरीच थांबवून त्यांच्यावर उपचार सुरू करणे आगामी काळात शक्य होणार नसल्याने अशा रुग्णांना एकत्रितरीत्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. विचाराधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. तोंडाभोवती र्निजतुकीकरण केलेले कापडी आवरण आवश्यक आहे. ते   तसे नसल्यास इतर आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वा करोना विषाणूच्या संसर्गात आलेल्या रुग्णाच्या संपर्कात काम करणाऱ्या नागरिकांनी वापरलेली आवरणे जाळून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.