गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व बँकाना देण्यात आल्या असून, सर्व बँकांनी त्यास मान्यता दिल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांनी दिली. कर्जावरील व्याजाची माफी देण्याचा विचार सुरू असून प्रचलित दरापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले.
जिल्हय़ात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी गोयल यांनी शुक्रवारी केलेल्या जिल्हय़ाचा दौरा केला. तालुक्यातील जवळे येथील नुकसानीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. विभागीय कृषी सहसंचालक एस. एल. जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी संभाजी सालके, मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कांबळे, बर्वे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते.
जवळे येथील बाळासाहेब आढाव यांच्या डाळिंबाच्या बागेची गोयल यांनी पाहणी केली. डाळिंबासाठी एकरी खर्च किती येतो, कर्जावरील व्याजाचा दर काय आहे, खर्च जास्त येत असताना कर्ज कमी का मिळते, उर्वरित रक्कम कशा पद्घतीने उभी केली जाते, या भागात किती वेळा गारपीट झाली, नुकसान झालेली फळे काढून उर्वरित किती फळे वाचू शकतील, कर्जाची वसुली करताना व्याज वसूल केले जाते की कर्जाचा हप्ता वसूल केला जातो आदींची माहिती त्यांनी घेतली. तेथेच असलेल्या कांद्याच्या पिकाचीही त्यांनी पाहणी केली.
शेतक-यांशी संवाद साधताना गोयल म्हणाले, बँकांना कर्जवसुलीची सक्ती करता येणार नाही. शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करणे बँकांना बंधनकारक आहे. मुख्य सचिवांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींची मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांना बैठक घेता आली नसली तरी अधिका-यांच्या बैठकीत सर्व बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करण्याचे मान्य केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात सध्या प्रचलित असलेल्या दरापेक्षा किती जास्त मदत करता येईल त्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.
शेतकऱ्याच्या डोळय़ांत अश्रू
डाळिंबाच्या बागेतून येत्या दोन महिन्यांत तब्बल दहा लाख रुपयांचे उत्पादन हाती येऊन बाळासाहेब आढाव या शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे दूर होणार होते. परंतु गारपिटीमुळे त्यांच्या या स्वप्नाचा चक्काचूर झाल्याने नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना माहिती देताना त्यांच्या डोळय़ांत अश्रू तरळले. दुर्दैवाची बाब म्हणजे आढाव यांच्या शेतापर्यंतच ही गारपीट झाली. तेथून पुढे पावसाचा थेंबही पडला नाही.