जिल्ह्यातील ९ मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी होणार असून दुपारी दोनपर्यंत निकाल स्पष्ट होईल. काही आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केले, तर व्हीव्हीपॅटमधील प्रिन्टच्या आधारे फेरमोजणीही होऊ शकते. मात्र, असे करण्यास सबळ कारण गरजेचे असेल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील ९ पकी ३ मतदारसंघांची मतमोजणी औरंगाबाद शहरात, तर फुलंब्रीची मतमोजणी मराठवाडा रिअलटर्स प्रा. लि.च्या इमारतीत होणार आहे. गंगापूरचे मतमोजणी केंद्रही काहीसे उशिराने ठरले. गंगापूर येथील क्रीडासंकुलात मतमोजणी होईल. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी असतील.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदान केंद्रे असल्याने १९ व्या फेरीतच निकाल लागेल, तर वैजापूरमध्ये सर्वाधिक ३२५ केंद्रे असल्याने तेथे तुलनेने अधिक फेऱ्या होतील. शुक्रवारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणी सुरूअसताना व नंतरही चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.