दुष्काळामुळे शेतकर्‍यांनी खचून न जाता शेती कशी करावी याचे उत्तम उदाहरण निवृत्त पोलिस अधिकार्‍याने फुलं आणि शिमला मिरच्याची शेती करुन आलेले पीक युरोप, गल्फ, ऑस्ट्रेलियाला निर्यात करुन दाखवले. या कौतुस्कापद प्रयोगाची विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मराठवाडा विकास वैधानिक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. भागवत कराड दखल घेत शासनाला कळवले आहे.

२०१३ साली लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातून पोलिस उपाधिक्षक म्हणून निवृत्त झालेले दिगंबर सर्जेराव गाडेकर असे या शेतकर्‍याचे नाव आहे.
शेवंतीचे फुलं आणि शिमला मिर्चीची शेती करुन त्यांनी केवळ दोन एकरमध्ये एकरी १८ लाख रुपये उत्पन्न घेत नवा उच्चांक प्रस्थापित केला. मराठवाडा आणि विदर्भातील ते एकमेव शेतकरी आहेत. ज्यांनी ही किमया करुन दाखवली.

केंद्र शासनाच्या नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डाकडे अर्ज करुन त्यांनी या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. प्रोव्हिडंड फंडाचे ५०लाख रु. त्यांनी या प्रकल्पांतर्गत सेंट्रल बँकेत गुंतवून दीड कोटी रु. कर्ज घेतले व फुलांची व शिमला मिर्चीची शेती करुन दाखवली. त्यांची फुले आता मुंबई, हैदराबाद सहित युरोप, दुबई ऑस्र्टेलिया या ठिकाणी निर्यात होतात. या प्रकल्पामधे केंद्र शासन ५६टक्के सबसिडी देते.

शहराजवळील कृष्णपूरवाडीजवळ गाडेकर यांची २५ एकर खडकाळ जमीन आहे. निवृत्त होण्याच्या दोनवर्ष आधी केवळ खडकाळ असल्यामुळे फक्त ६ लाख रुपयांना त्यांना ही जमीन मिळाली. ही जमीन मिळाल्यानंतर शासनाच्या झालर क्षेत्राचे काम सुरु झाले होते. गाडेकर यांचा भूखंड रोडटच असल्यामुळे भविष्यात या जमिनीला चांगला भाव मिळण्याची शक्यता होती. पण झालर क्षेत्रातील अधिकार्‍यांनी ही जमीन येलो क्षेत्र प्रमाणपत्र देण्याकरता गाडेकर यांना लाच मागितली. आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातून निवृत्त झाल्यामुळे त्यांनी लाच देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे २०१४साली चिडून झालर क्षेत्र विभागाने गाडेकर यांना ग्रीन झोनचे प्रमाणपत्र वितरित केले. यामुळे दिगंबर गाडेकर यांना शेती करण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग त्यांनी खडकाळ जमीनीचे कृषीविभागाकडून परिक्षण करुन घेतले. तेव्हा या जमीनीच्या मातीत अॅसीड अल्काईनचे प्रमाण जास्त आढळले. त्याकरता कृषी विभागाने त्यांना लालमाती वापरुन या जमिनीचा वापर करु शकता असा अहवाल दिला आणि प्रयोग म्हणून दोन एकरावर लाच म्हणून मागितलेल्या रकमेची त्यांनी लाल माती खरेदी करुन दोन एकरावर एकफूट उंचीचा थर पसरवला आणि फुलांची शेती केली. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आता दिगंबर गाडेकर यांनी जैन एरिगेशन ची इ वॉटर यंत्रणा शेतात बसवून लॅपटॉपवरुन कमांड देऊन खते आणि पाणी पुरवठा करतात. माणसांप्रमाणेच पिकांना फिल्टर्ड पाणी पुरवठा केला तर नेहमीपेक्षा पिक २०टक्क्याने जास्त वाढते असेही गाडेकर यांच्या निर्दशनास आले. त्यासाठी त्यांनी भूखंडाजवळ विहीर खंदून अडीच कोटी लिटर आणि दीड कोटी लिटरचे दोन शेततळे तयार करवून घेतले. या तळ्यामधून ते शेवंती आणि शिमला मिर्चीला पाणी पुरवठा करतात.

एक एकरच्या शेवंतीच्या फुलांचे वर्षातून तीन वेळेस पीक घेतले जाते. तर दुसर्‍या एकरावर शिमला मिर्चीचे पिक घेतले जाते. फुलांचे एक रोप १२ रु. किमतीचे असते तर मिर्चीचे २ रु. किमतीचे.शेवंतीच्या फुलांची एक दोन लाख रोपे त्यांनी लावली तर मिर्चीचे १२ हजार रोपे लावली. दर दोन महिन्यांनंतर मिर्चीचे पीक मिळते. एका झाडातून ७किलो मिर्ची एकावेळेस मिळते. शिमला मिर्ची मात्र त्यांची औरंगाबादचे व्यापारी बाहेर जाऊ न देता शहरातच खरेदी करुन टाकतात. दोन्ही शेती त्यांनी नेटशेड वापरुन केल्या. फुलांसाठी सूर्यप्रकाशाईतकेच एल.ई.डी. लाईटचा प्रकाशही फुलांची रोपटे वाढण्यास खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे फुलांच्या शेतीवर आठतास दहा हजार एल.ई.डी.बल्बचा प्रकाश, अठरा तास अंधार आणि नंतर सूर्यप्रकाश अशा पध्दतीने मशागत केली जाते. फुलांच्या शेतीसाठी अॅटॉमिटक फोगर वॉटर सिस्टीम बसवण्यात आली आहे. ३५अंशाच्यावर नेटशेडमधील तपमान असले की फोगर आपोआप सुरु होतात आणि तपमान ३५ अंशावर आले की फोगर( फवारणी) बंद होतात.

अशा जिगरबाज दिगंबर गाडेकर यांनी आपल्या शेतीचा प्रयोग अल्पभूधारक शेतकर्‍यांनी करावा त्यासाठी शासनाने त्यांना अर्थसहाय्य करावे असा प्रस्ताव मराठवाडा वैधानिक विकास मंडळासमोर ठेवला आहे. दरम्यान, गाडेकर यांना झालर क्षेत्र प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी दिलेला त्रास शासन दरबारी कळल्यानंतर याच ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनेची घरे बांधण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे.