एजाजहुसेन मुजावर

पवित्र मक्का येथे सध्या हजयात्रा सुरू आहे. या हज यात्रेदरम्यान भारताचा स्वातंत्र्यदिन आला होता. याचे औचित्य साधत सोलापूर येथील एका निवृत्त पोलिस आधिकाऱ्याने देशभक्ती दाखवत हज यात्रेमध्ये तिरंगा फडकावला आहे. सोशल मीडियावर सध्या या दांपत्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहम्मद पठाण आणि त्यांच्या पत्नीने हज यात्रेमध्ये स्वातंत्र्य दिनी तिंरगा फडकवत लाखो भाविकांचे लक्ष वेधले.

सध्या सुरू असलेल्या हज यात्रेसाठी हजारो भारतीय मुस्लीम भाविक तीर्थक्षेत्र मक्का येथे गेले आहेत.  हज यात्रेदरम्यान भारतीय स्वातंत्र्य वर्धापनदिनाचे औचित्य साधून मोहम्मद पठाण यांनी तिरंगा फडकावला. मोहम्मद पठाण यांनी हज यात्रेमध्ये भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटला. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहम्मद पठाण यांनी लाखो भाविकांच्या गर्दीत हातात तिरंगा ध्वज घेऊन काबाला प्रदक्षिणा घातली. यावेळी त्यांनी उपस्थीत असलेल्या सर्वच भाविकांचे लक्ष वेधले आणि भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त केला.

सोलापूरातील लऊळ या गावचे रहिवासी असणारे मोहम्मद पठाण यांनी ३२ वर्षे महाराष्ट्र पोलिसांत कर्तव्य बजावले आहे. नांदेड येथे असताना सात वर्षापूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून पठाण यांनी निवृत्त स्विकारली. मोहम्मद पठाण यांची ही दुसरी हज यात्रा आहे.

सोशल मीडियावर मोहम्मद पठाण आणि त्यांच्या पत्नीवर कौतुकाची थाप टाकली जात आहे. प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत आहे. अभिमान आहे भारतीय असल्याचा,परदेशात तिरंगा ध्वज घेऊन मातृप्रेम दाखवणाऱ्या मुस्लिम बांधवांचा अभिमान आहे. असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे. तर भारतावरील तुमचे प्रेम असेच राहो असे अनेकजन म्हणत आहेत.