20 January 2020

News Flash

परतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त

रविवारी व सोमवारी असे सलग दोन दिवस जिल्हय़ात जोरदार पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसाने नदी, नाले, ओढे वाहून निघाले.

संग्रहित छायाचित्र

मांजरा धरणात १४.४ दलघमी पाणी

परतीच्या पावसाने लातूर जिल्हय़ावरील पिण्याच्या पाण्याच्या संकटाचे मळभ यावर्षीच्या हंगामापुरते दूर झाले आहे. आता उन्हाळय़ातही जिल्हय़ातील सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध होईल इतका जोरदार पाऊस झाला आहे.

रविवारी व सोमवारी असे सलग दोन दिवस जिल्हय़ात जोरदार पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसाने नदी, नाले, ओढे वाहून निघाले. तावरजा, तेरणा व मांजरा नद्या वाहत्या झाल्या. वांजरखेडा, कासार पोहरेगाव हे मांजरा नदीवरील बंधारे तुडुंब भरले होते. त्यानंतर नागझरी व साई हे बंधारेही भरल्यामुळे त्याचे दरवाजे उघडण्याची वेळ आली.

निम्नतेरणा मध्यम प्रकल्पात तब्बल ४५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असल्याने आता परिसरातील कोणत्याच गावाला पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. कारसा पोहरेगाव व वांजरखेडा बंधाऱ्यात दोन्ही मिळून १२ दलघमी इतके पाणी आहे. शिवाय नागझरीचे पाणी वेगळेच. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मांजरा नदीवरील बंधारे बांधले गेले.

२३ जून २००५ रोजी राज्य शासनाने जेव्हा मांजरा धरणातील पाणीसाठा संपेल तेव्हा या बंधाऱ्यातील पाणी लातूर शहराला पिण्यासाठी आरक्षित केले जाईल, असे आदेश काढले होते. मात्र, दुर्दैवाने या बंधाऱ्यातील पाणी शहराला पिण्यासाठी न वापरता परिसरातील शेतकरी उसासाठीच या पाण्याचा वापर करतात. जिल्हाधिकाऱ्यांनी २०१६च्या पाणी टंचाईनंतर या वर्षीची पाणीटंचाई अनुभवली आहे. या दोन्ही बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची गरज आहे अन्यथा बंधाऱ्यात पाणी आहे म्हणून त्याचा वारेमाप उपसा उसासाठी होईल व नंतर पुन्हा ‘असल्या दिवशी दिवाळी अन् नसल्या दिवशी शिमगा’ करण्याची पाळी येईल.

रविवारी रात्री पडलेल्या पावसाने मांजरा धरणात ३.३४७ दलघमी पाणी आले तर सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने मंगळवारी सकाळी पुन्हा ४.११ दलघमी पाणी आले. आता मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा १४.४ दलघमी आहे त्यामुळे उन्हाळय़ापर्यंत आता लातूर शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. अपेक्षित पावसाच्या ८८.३६ टक्के इतका पाऊस आतापर्यंत झाला असून तो वार्षकि सरासरीच्या ८३.१६ टक्के झाला आहे.

परतीचा पाऊस नोव्हेंबरमध्येही’

परतीचा पाऊस हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पडेल. शासनाच्या हवामान खात्याने परतीचा पाऊस संपला असल्याचे जाहीर केले आहे. या खात्याने दिशाभूल न करता शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे मत हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.

First Published on October 23, 2019 2:51 am

Web Title: return rain no tanker dam full water akp 94
Next Stories
1 मांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी
2 हमी भावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी
3 भात पीक धोक्यात
Just Now!
X