अलिबाग तालुक्यात आता शहाबाजपाठोपाठ रेवदंडा येथेही बोगस मतदार नोंदणी झाल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक सुरेश ढोलके यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत ही बाब उघडकीस आली आहे. रेवदंडा ग्रामंपचायतीचे उपसरपंच राजेंद्रकुमार वाडकर व खलील युनुस तांडेल याप्रकरणी दोषी असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ढोलके यांनी अलिबागच्या प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.
सुरेश ढोलके यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. ही माहिती ढोलके यांना मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून १५ डिसेंबरला मिळाली. या माहितीत काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे ढोलके यांनी सांगितले. आरक्षित जागा लढवण्यासाठी बोगस मतदार नोंदणीचे षड्यंत्र रचण्यात आल्याचे या माहितीत समोर आले.
वैजयंती अनंत पाटील यांनी रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत मतदार नोंदणीसाठी अर्ज केला होता, परंतु पाटील या मूळच्या अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावातील रहिवासी आहेत. त्यांनी महादेव कोळी जातीसाठी आरक्षित जागा लढवण्यासाठी रेवदंडा येथे मतदार यादीत नाव टाकल्याचे समोर आले आहे. मतदार नोंदणी अर्जात त्यांनी उपसरपंच राजेंद्रकुमार वाडकर यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहात असल्याचा दाखला दिला आहे, असा आरोपही ढोलके यांनी केला आहे.
दुसरे अर्जदार हषा खेल्या दरोडा हे मूळचे खैरवाडी गावचे रहिवासी असून त्यांनीही रेवदंडा येथे मतदार यादीत नावनोंदणी करण्याचा अर्ज केला आहे. अनुसूचित जागेवर निवडणूक लढवता यावी म्हणून त्यांनी हा अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरोडा यांनाही राजेंद्रकुमार वाडकर यांनी भाडेकरू असल्याचा दाखला दिला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही अर्जदारांकडे रेशनिंग कार्ड नाही, केवळ आरक्षित जागा लढवत्या याव्या म्हणून हे अर्ज करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. तर राजेंद्रकुमार वाडकर व खलील युनुस तांडेल यांनी बोगस मतदार नोंदणीसाठी खोटे दाखले दिले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोघांनी शासनाची फसवणूक केली असल्याचे ढोलके यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची पोलीस चौकशी करून वाडकर याच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमच्या कलम ३१ नुसार कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांच्याकडे केली आहे.