आश्रयदात्यांसह १० जण अटकेत; १० मेपर्यंत कोठडी

नगर : दोन टोळ्यातील पूर्ववैमनस्य व मुलीच्या ‘नाजूक’ प्रकरणातील कारणावरून सोमनाथ तांबे या युवकावर भेंडा (ता. नेवासे) येथे गावठ्ठी कट्टय़ातून गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात नेवासे पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील ५ व त्यांना आश्रय देणारे ५ अशा एकूण १० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या काही जणांना दिनांक १० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पोलिस निरीक्षक विजय करे यांनी ही माहिती दिली. शुभम विश्वनाथ गर्जे, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ, शुभम किशोर जोशी, प्रसाद शिवाजी दळवी (सर्व रा. शहरटाकळी, ता. शेवगांव) तसेच त्यांना पसार होण्यासाठी मदत करणारे, शहरटाकळी व शिरूर कासार (बीड) येथील लॉजवर लपण्यास मदत चरणारे अक्षय संजय आपशेटे, ओंकार राजें काकडे, अमोल अशोक गडाख, अमोल राजेंद्र शेजवळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या संदर्भात गोळीबारात जखमी झालेल्या सोमनाथ याने दिशाभूल करण्यासाठी वेगळ्याच आरोपींची नावे फिर्यादीत दिल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक निरीक्षक विजय ठाकूर व उपनिरीक्षक भरत जाते यांच्या पथकाने तीन दिवसांतच गुन्ह्यची उकल केली.

सोमनाथ तांबे (२१) या तरुणावर रविवारी रात्री भेंडा गावाजवळ गोळीबार करण्यात आला. त्यातून तो बचावला मात्र जबर जखमी झाला आता त्याची प्रकृती सुधारत आहे. त्याच्या तक्रारी व वर्णनावरून कुकाणा येथील पप्पू जावळे व गणेश पुंड या दोघांना पोलिसांनी सुरुवातीला अटकही झाली होती. मात्र  पोलिसांना गोळीबाराचे कारण स्पष्ट  होत नसल्याने संशय निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी गुन्ह्यतील फिर्यादीला विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीच्या ‘नाजूक’ प्रकरणातील कारणावरून सोमनाथ तांबे याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार या गुन्ह्यत समोर आला व आरोपींनी गोळीबाराचा खोटा बनाव केल्याचेही समोर आले.

शुभम गर्जे व पप्पू जावळे या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांची कुकाणे येथे धुमश्चक्री उडाली होती. मुलीच्या नाजूक प्रकरणाची जोड मिळाली. त्यातूनच तांबे याच्यावर गोळीबाराचा करायचा व त्यामध्ये जावयाला अडकवायचे असा बनाव तयार करण्यात आला. परंतु पोलीस निरीक्षक करे यांनी ५० हून अधिक युवकांची चौकशी करत आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांवर दगडफेक

आरोपी शिरूर कासार (बीड) येथील एका लॉजवर लपले होते. आरोपीने लपण्यासाठी एकाच्या बनावट नावावर लॉजच्या खोलीची नोंदणी  केली होती. पोलिसांनी काल, मंगळवारी रात्री लॉजवर छापा टाकला. लॉजचा मालक व कर्मचाऱ्यांनी दरोडेखोर समजून पोलिसांवरच दगडफेक केली. पथकाने नेवासा पोलीस असल्याची खात्री पटवल्यावर दगडफेक थांबली. शिरूर कासार गावाजवळ दोन दिवसांपूर्वी दरोडा पडला. हे दरोडेखोर पुन्हा आले असावेत या संशयावरून लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली, मात्र त्यात कोणीही जखमी झाले नाही.