७४  प्रकरणांमध्ये १०२ कर्मचारी जाळ्यात

अमरावती : राज्यातील महसूल यंत्रणा  लाचखोरीत आघाडीवर असून गेल्या चार महिन्यांमध्ये ७४  प्रकरणांमध्ये १०२ महसूल कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. आतापर्यंत  ३०६ लाच प्रकरणांची नोंद झाली असून सुमारे ८० लाख रुपयांची लाच मागण्यात आलीआहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताज्या अहवालनुसार १ जानेवारीपासून ७ मेपर्यंत लाच प्रकरणी ३०६ सापळे लावले होते, त्यात ४१६ अधिकारी, कर्मचारी अडकले. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे आठ विभाग आहेत. सरकारी कर्मचारी लाच घेत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबी शहानिशा करून संबंधितावर कारवाई करते.

गेल्या चार महिन्यांत  महसूल कर्मचाऱ्यांनी ९ लाख ७९ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याखालोखाल पोलीस यंत्रणेचा क्रमांक लागतो. पोलीस विभागातील ९० जण एसीबीच्या सापळ्यात सापडले आहेत. एकूण ६७ प्रकरणांमध्ये लाचेची रक्कम ३८ लाख ४ हजार होती. महापालिका आणि जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील लाचखोरी वाढीस लागली असून महसूल विभागानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांशी सर्वसामान्यांचा संबंध येतो. लाचेची रक्कम तुलनेने कमी असली, तरी लोक या व्यवस्थेत भरडले जातात. आता या कर्मचऱ्यांच्या विरोधात देखील एसीबीकडे तक्रार करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

गेल्या चार महिन्यांत महापालिकांमध्ये लाचेची १६ प्रकरणे निदर्शनास आली. यात २० जणांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. महावितरणचे १२ भ्रष्ट कर्मचारी ११ प्रकरणांमध्ये एसीबीच्या हाती लागले आहेत. यात  ५७  कर्मचाऱ्यांनी हजार रुपयांची लाच मागितली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातील केवळ तीन कर्मचाऱ्यांना एसीबीने पकडले, त्यांची लाच २९ हजार रुपयांची होती.

गेल्यावर्षीपेक्षा या चार महिन्यांमध्ये लाचेची रक्कम कमी झाली असली, तरी भ्रष्टाचाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.  गेल्या वर्षांत लाचप्रकरणाता ८९१ भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी अडकले होते.

तक्रारकर्त्यांच्या संख्येत वाढ

लाच प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जमातीतील लोकांमध्ये जागरूकता वाढली असून लाचखोरांना गजाआड करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार कमी होईल, ही अपेक्षा मात्र लाचखोरी वृत्तीने फोल ठरवली आहे.