महसूल कर्मचा-यांनी आज, शुक्रवारपासून महसूलदिनाचे औचित्य साधत बेमुदत संप सुरू केल्याने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच धरणे धरली.
पदोन्नत नायब तहसीलदार, वर्ग ३ व ४ चे कर्मचारी व वाहनचालक संपात सहभागी आहेत. जिल्हय़ातील सर्व म्हणजे ७५० कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी केला. कर्मचारी संपात सहभागी असले तरी महसूलदिनानिमित्त झालेल्या उत्कृष्ट महसूल अधिकारी-कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभात ते सहभागी झाले होते.
नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवावा, लिपिक नाव बदलून महसूल सहायक असे नाव पदास द्यावे, चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत एकाच पदावर कायम राहात असल्याने त्याच्या मुलास खात्यात नोकरी मिळावी, नायब तहसीलदार पदे पदोन्नतीने भरावीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पदांसाठी खात्यातील कर्मचा-यांसाठी ५ टक्के जागा राखून ठेवाव्यात, शिपाई पदांना तलाठी पदावर पदोन्नती द्यावी, चतुर्थश्रेणीच्या कर्मचा-यांना लिपिक पदासाठी ५० टक्के पदोन्नती द्यावी आदी २५ मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी काळय़ा फिती लावून काम करणे, लेखणी बंद आंदोलन करण्यात आले, मात्र सरकारने दखल न घेतल्याने संप पुकारण्यात आल्याचे डमाळे यांनी सांगितले. डमाळे यांच्यासह सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, कोषाध्यक्ष कैलास साळुंके आदी नेतृत्व करीत आहेत.