महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा रायगडच्या वतीने बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली होती. सर्व अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक, टंकलेखक, कोतवाल, शिपाई संवर्गातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आले होते. नायब तहसीलदारपदाचा ग्रेड पे वाढवून चार हजार सहाशे रुपये करण्यात यावा, महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका मुलाला खात्यामध्ये नोकरीसाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कोतवालांना चतुर्थश्रेणीचाचा दर्जा देण्यात यावा, अनुकंपातत्त्वावरील सेवा भरतीची दहा टक्के अट रद्द करण्यात यावी, हवालदार, नाईक, दप्तरी, पदाचे मूळ वेतन लिपिकाप्रमाणे लागू करण्यात यावे, वाहनचालकांना विशेष भत्ता देण्यात यावा, वर्षांनुवष्रे कार्यरत असलेली पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. ती स्थायी करण्यात यावी, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले लक्षात घेता जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद असणारा कायदा करण्यात यावा व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, शासनाच्या नवीन योजना राबविताना त्या योजनेकरिता स्वतंत्र कर्मचारीवर्ग देण्यात यावा अशा अनेक मागण्या शासन दरबारी राज्य महसूल कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आल्या; परंतु शासनाने अद्यापपर्यंत मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले.