टाळेबंदीमुळे गेल्या ४० दिवसांपासून राज्यात आणि राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला होता. परराज्यातील नागरिकांबरोबरच राज्यातील महानगरांत अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी सरकारने दिली. यामुळे टाळेबंदी लागू झाल्यापासूनच गावची ओढ लागलेल्या हजारोंचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आज टाळेबंदीमुळे अडकलेल्या लोकांसाठी राज्य सरकारनं हेल्पलाइन सुरू केली आहे.

टाळेबंदीमुळे विविध राज्यात, शहरात, अडकलेले नागरिक, कामगार, विद्यार्थी व इतरांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून यासाठी नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या केल्या असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यांनी ट्विट करून यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या नोडल ऑफिसरचे संपर्क क्रमांकही शेअर केले आहेत.

सरकारने या स्थलांतराबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. सर्व जिल्हाधिकारी या प्रक्रियेचे प्रमुख (नोडल अधिकारी) असतील. या संपूर्ण प्रक्रियेवर मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे देखरेख ठेवण्यात येईल. याबाबत सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

टाळेबंदीमुळे राज्यात विविध ठिकाणी परराज्यांतील श्रमिक, नागरिक असे ५ लाख ४४ हजार लोक अडकले आहेत. तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांतील नागरिकही आपापल्या गावी परतण्यास इच्छुक आहेत. राज्य सरकारांच्या आग्रहानंतर केद्राने परराज्यांतील मजुरांच्या स्थलांतरास परवानगी दिली. त्यानुसार राज्य सरकारने परराज्यात जाणाऱ्या आणि तेथून महाराष्ट्रात परतणाऱ्या तसेच राज्यातही विविध ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना स्थलांतराची परवानगी देत मोठा दिलासा दिला.