निवडणुकांमध्ये येत असलेले अपयश, जातीयतेचे न जमणारे गणित यामुळे शरद पवार यांना नैराश्य आले आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत अधिकृत माहिती का दिली जात नाही. हा सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्न आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली होती. याबाबत पाटील म्हणाले, पंतप्रधानांना धोका असल्याचे पत्र मिळाले आहे. पण याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चौकशी न करता पवारांनी थेट पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही. त्यांच्याविषयी जरूर आदर आहे. पण अशाप्रकारची टिप्पणी त्यांनी करू नये. पंतप्रधान पक्षाचे नव्हे तर देशाचे आहेत. अशा प्रकारच्या टिप्पणीमुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या यंत्रणेला बळ मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. केंद्र व राज्यात दीर्घकाळ यांचेच सरकार असताना मराठा आरक्षण, सीमा प्रश्‍न याची सोडवणूक का करता आली नाही, अशी विचारणा पाटील यांनी केली.

भुजबळ दोन वर्षे तुरुंगात कसे

पुणे येथे झालेल्या सभेत भुजबळ यांनी सरकारचे वाभाडे काढतानाच आपण निर्दोष असताना विद्यमान सरकारने अडकावल्याची खंत व्यक्त केली होती. यावर बोलताना पाटील यांनी भुजबळ निर्दोष होते तर न्यायालयाने त्यांना दोन वर्षे तुरुंगात कसे ठेवले, अशी पृच्छा करून न्यायदेवता याचा फैसला करेल, असे सांगितले .

राजू शेट्टींनी स्वतःची काळजी वाहावी

खासदार राजू शेटटी यांनी कोल्हापुरात भाजपा औषधालाही उरणार नाही, अशी टीका केली होती. त्यावरून पालकमंत्र्यांनी शेट्टींवर टीकेचा आसूड ओढला. भाजपाची सतत प्रगती होत आहे. शेट्टींच्या शिरोळमध्ये जिल्हा परिषदेच्या ७ जागांपैकी भाजपा तीन तर स्वाभिमानी फक्त एका जागेवर विजयी झाला आहे. शेटटी यांनी भाजपावर बोलण्यापेक्षा अगोदर स्वत:च्या जागेवर आपण निवडून येणार का, याची काळजी आधी वाहावी, असा टोला लगावला.