खडसेंकडून श्रेयासाठी आटापिटा असल्याचा नागरिकांना प्रत्यय
निम्नतेरणा प्रकल्पातून ५० लाख लिटर व मिरज जलदूतद्वारे ५० लाख लिटर लातूरला पाणी दिले जात असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सोमवारी सांगितले. मात्र, त्यांची ही माहिती ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या सदरात मोडणारी असल्याचा प्रत्यय लातूरकरांना येत आहे. केवळ श्रेयासाठी खडसे यांचा सारा आटापिटा असल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांनी उद्घाटन केलेल्या बेलकुंड येथील पाणी योजनेतून एक थेंबही पाणी मंगळवारी दुपापर्यंत लातूरकरांच्या टाकीत पडले नव्हते.
निम्नतेरणा प्रकल्पातील बंद पडलेली दहाखेडी पाणीयोजना नव्याने कार्यान्वित करण्याच्या सूचना खडसे यांनी दिल्या होत्या. या कामाची कोणालाही कुणकुण लागू न देता ते पूर्ण करा, असे खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. शहरापासून ४४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेलकुंड येथे योजनेच्या उद्घाटनासाठी ते १४ एप्रिलला खास हेलिकॉप्टरने आले. कळ दाबून त्यांनी उद्घाटन केले. नंतर या योजनेमुळे लातूर शहराला नव्याने ५० लाख लिटर दररोज पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले होते. यातील ३० लाख लिटर टँकरद्वारे, तर २० लाख लिटर पाणी बंद वाहिनीद्वारे दिले जाईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. धक्कादायक बाब अशी की, अजूनही योजनेतून पाणी मिळाले नाही.
मिरजेहून गेल्या ९ दिवसांपासून दररोज ५ लाख लिटर पाणी जलदूतने येत आहे. आज (बुधवारी) २५ लाख लिटर पाणी घेऊन ५० वाघिणीची रेल्वे येणार आहे. दररोज एक रेल्वे आली तरी २५ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी लातूरला पोहोचू शकणार नाही. मात्र, खडसे यांनी मुंबईत मिरजेहून रोज ५० लाख लिटर पाणी देत असल्याचे ठोकून दिले.

यंत्रणेतील अडचणी
जुनी जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू होते, तेव्हा त्या परिसरात दूरध्वनीची केबल टाकण्याचे काम सुरू होते. १४ एप्रिलनंतर दोन-तीन ठिकाणी पाइपमधून गळती सुरू झाली. ती थांबवण्यात पाच दिवस गेले. बेलकुंड येथील पाण्याची टाकी ३ लाख लिटर साठवणूक क्षमतेची आहे. दर तासाला ती टाकी भरता यावी, यासाठीची यंत्रणा उपलब्ध आहे. ५० लाख लिटर पाणी उचलण्यासाठी दिवसातून १८ वेळा टाकी भरून रिकामी करण्याची व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्यासाठी २५ हजार लिटर क्षमतेचे २०० टँकर भरून नेले पाहिजेत. या क्षमतेचे ७० टँकर उपलब्ध असले, तरी प्रत्यक्षात एवढी यंत्रणा कार्यान्वित झाली नाही.