महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आज (रविवारी) घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची‘दुष्काळ व त्याचा करावयाचा सामना’ या विषयावर शिकवणी घेताना अनुभवाचे धडे दिले. त्याचबरोबर आदर्श काम करण्याच्या सूचनाही यंत्रणेला दिल्या.
सभापती सोनाली बोराटे, उपसभापती किरण पाटील, जि. प. सदस्य राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, परमवीर पाडुंळे, युवा नेते राजेंद्र देशमुख, काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुकें आदींसह तहसीलदार जयसिंग भैसडे, गटविकास अधिकारी सावंत व अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीलाच थोरात यांनी तालुक्यात टँकरच्या, पाणीपुरवठयाच्या खेपा पूर्ण होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाटेवाडी येथे टँकर भरण्यासाठी उदभवावर जाण्यास रस्ताच नाही याकडे घुले यांनी लक्ष वेधले. थोरात यांनी गेल्या वर्षी दिलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत का, अशी विचारणा केली असता प्रकाश सुपेकर यांनी सर्व टाक्या गायब झाल्याचे लक्षात आणून दिले. किरण पाटील यांनी कुकडीचे पाणी तातडीने सीना धरणात सोडण्याची मागणी केली.  
राज्य सरकार दुष्काळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्व मदत करेल, मात्र अधिका-यांना चांगले काम करावे, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘होमवर्क’ करा, प्रत्येक तालुक्याच्या गावांची अ, ब, क अशी वर्गवारी करून कसे नियोजन करावयाचे याची माहिती थोरात यांनी दिली. या दोन्ही अधिका-यांनी त्याचे मुद्दे लिहून घेतले. शेतकरी संघटनेचे संजय तोरडमल यांनी तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी नाहीत व अधिकरी काम करीत नसल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला असे सांगितले. कंमाड गावांना रोहयोची कामे देण्याची व विहिरींची कामे नरेगातून करावीत आदी मागण्या करण्यात आल्या.
या वेळी जिल्हाधिका-यांनी प्रत्येक गावाला शिवारफेरी करावी असे सांगताना दुष्काळाला तोड देण्यासाठी पाण्याचे जे स्रोत आहेत तेच पुन्हा या वेळी व्यवस्थित करणार असल्याचे सांगितले.