राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरानिमित्त येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मराठवाडय़ातील दुष्काळाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, बबनराव लोणीकर आदी मंत्री उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जायकवाडीसाठी वरच्या धरणातून पाणी सोडायचे किंवा नाही, त्याचे प्रमाण किती असावे याबाबतचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरण घेईल असे स्पष्ट केले.मराठवाडा यंदा दुष्काळाने होरपळत आहे. सर्व प्रमुख धरणांतील जलसाठा आठ टक्क्य़ांपर्यंत आटला आहे. या पाश्र्वभूमीवर संघ शिबिरासाठी येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीत  मदतीबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आली नाही.

मराठवाडय़ाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक सप्टेंबरमध्ये होईल. दुष्काळाचा आढावा तर होतच राहील पण मराठवाडय़ातल्या इतर प्रश्नांवरही चर्चा व्हावी म्हणून या बैठकीचे आयोजन होणार आहे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

बैठकीतील मुद्दे..

बीड, उस्मानाबाद लातूर या तीन जिल्ह्य़ांतील परिस्थिती चिंताजनक

दुष्काळग्रस्त भागात कोठून व कसे पाणी आणायचे, त्याचे स्रोत कोणते याचे नियोजन प्रशासनाने केले

वैरण विकास कार्यक्रमाबरोबरच हायड्रोपोनिक पद्धतीने चारा पिकविण्याचे प्रयोगही हाती घेणार

पाणीपुरवठय़ाची देणी शिल्लक राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्यास त्याचे नियोजनही केले जाणार