22 January 2021

News Flash

आयारामांमुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा बाज बदलणार?

विधानसभेच्या मागील निवडणुकीत पाचपैकी तीन जागा काँग्रेसने राखल्या, तर दोन जागांवर भाजपला यश मिळाले होते. 

वेध विधानसभेचा

संतोष मासोळे, धुळे

भाजपच्या महाजनादेश यात्रेतून विरोधी पक्षातील नेत्यांना आवतण दिले जात असतानाच धुळे जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघांवर त्याचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. आजवर भाजपचे कट्टर विरोधक म्हणून राजकारण करणारे आमदार, नेते त्या पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील राजकारणाचा बाज बदलू शकतो. या घडामोडींनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेच्या गोटातही अस्वस्थता आहे.

विधानसभेच्या मागील निवडणुकीत पाचपैकी तीन जागा काँग्रेसने राखल्या, तर दोन जागांवर भाजपला यश मिळाले होते.  काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने दोन्ही पक्षांच्या गोटांत अस्वस्थता आहे. काँग्रेसतर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेताना प्रदेश सरचिटणीस डॉ. हेमलता पाटील आणि निरीक्षक माजी आमदार शिरीष चौधरी यांनाही त्याचा अंदाज आला. तथापि धुळ्यातील नेते काँग्रेसमध्येच राहतील, असे सांगत त्यांनी मुलाखतीचा कार्यक्रम आटोपला. या मुलाखतीला अनुपस्थित राहिलेले कुणाल पाटील आणि डी. एस. अहिरे या आमदारांबाबत चर्चा सुरू आहे. संबंधित नेत्यांनी यावर ठोस खुलासा केला नसल्याने संभ्रम आणखी वाढला आहे. कधीकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या जिल्ह्य़ात गटबाजी, हमरीतुमरी विरोधकांच्या पथ्यावर पडली. शिवसेनेची वेगळी अवस्था नाही. दोन्ही पक्षांतील गटबाजीचा लाभ उठवत भाजपने पाय रोवले.

धुळे शहर मतदारसंघात मागील निवडणूक प्रारंभी भाजपसाठी कठीण वाटत होती. अनिल गोटे हे भाजपचेच आमदार होते. त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात राष्ट्रवादी बऱ्यापैकी यशस्वी ठरली होती. परंतु महापालिकेवर सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांना पराभूत करत गोटे हे पुन्हा निवडून आले होते.  धुळे महापालिकेवर भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित करताना शिवसेनेसह विरोधकांची धूळधाण उडवली. गोटेंची हकालपट्टी झाली असल्याने भाजप या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी देईल. राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असून मतदारसंघात काँग्रेसची अवस्था तोळामासा आहे.

धुळे ग्रामीण मतदारसंघात २००९ मध्ये माजी मंत्री रोहिदास पाटील यांना पराभूत करून शिवसेनेचे शरद पाटील यांनी विजय मिळविला होता. पुढील काळात त्यांच्या राजकारणाची पध्दत बदलली. यामुळे गेल्या निवडणुकीत रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल यांनी हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला. पण, आगामी निवडणुकीत तेच भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांनी पक्षाच्या मुलाखतीकडे पाठ फिरविल्याने संशय अधिकच बळावला. संघटनात्मक ताकद असल्याने शिवसेना या जागेवरील दावा सोडणार नाही.

साक्री मतदारसंघातील परिस्थिती आणखी वेगळी आहे. मूळचा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ. काँग्रेसचे त्यावर वर्चस्व होते. अलीकडच्या निवडणुकांमध्ये भाजपने पाय रोवले. माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पक्षाची ताकद वाढविली. त्याची परिणती, भाजप प्रवेशोच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याचे मानले जात आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे डी. एस. अहिरे हे केवळ तीन हजारांच्या फरकाने निवडून आले होते. भाजपच्या मंजुळा गावित यांनी काँग्रेसची दमछाक केली. यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढाई होईल. शिंदखेडा मतदारसंघातील सत्ताकेंद्रांवर पर्यटनमंत्री जयकुमार यांचे वर्चस्व आहे. त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांची घरकुल प्रकरणात गुन्हा दाखल होऊन कारागृहात रवानगी झाली. गेल्या वेळी राष्ट्रवादीने चांगली लढत दिली होती. काँग्रेसही या जागेवर दावा सांगत आहे.

शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल यांची एकहाती सत्ता आहे. हा मतदारसंघ राखीव असल्याने त्यांना निवडणुकीत उतरता आले नव्हते. पण त्यांनी आपले निकटवर्तीय काशिराम पावरा यांना काँग्रेसचे तिकीट देऊन निवडून आणले. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघाकडे पाहिले जाते. मतदारसंघात भाजपने बस्तान बसविले आहे.ं

जिल्ह्य़ातील राजकीय चित्र

* धुळे शहर –    भाजप

* साक्री      –      काँग्रेस

* शिरपूर –        काँग्रेस

* शिंदखेडा –      भाजप

* धुळे ग्रामीण – काँग्रेस

भाजप जिल्ह्य़ात सर्वच मतदारसंघांत उमेदवार देणार आहे. सर्व उमेदवार बहुमताने निवडणूक जिंकतील याबद्दल आत्मविश्वास आहे. विकासकामांच्या मुद्दय़ावर विधानसभेत भाजप यश मिळवेल.

– अनुप अग्रवाल (जिल्हाध्यक्ष, भाजप)

भाजपविरोधात प्रचंड असंतोष आहे. याचा आघाडीला नक्कीच फायदा होईल. जिल्ह्य़ातील कोणताही नेता पक्ष सोडणार नाही.

– श्यामकांत सनेर (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2019 1:54 am

Web Title: review of five assembly constituencies in dhule district for elections zws 70
Next Stories
1 जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी निवडणूक लांबणीवर
2 हव्या तेवढय़ा यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका
3 महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्र्यांची अपयशाची कबुली – खा. डॉ. अमोल कोल्हे
Just Now!
X