मध्य प्रदेशातून परभणी शहरात विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे रिवॉल्व्हर, तसेच ७ जिवंत काडतुसे व कत्ती नवा मोंढा कॉर्नर परिसरातील घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मध्य प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतुसे परभणी शहरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अतिरिक्त अधीक्षक नियती ठाकर यांनी या बाबत सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील हॉटेल व लॉजची तपासणी सुरू केली. गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता नवा मोंढा कॉर्नर येथील संजुसिंग संतोषसिंग जुन्नी याच्या घरी छापा टाकला. या वेळी घरात त्याचा भाऊ अमताब ऊर्फ गोलीसिंग झोपला होता. पोलिसांनी घराची झडती घेतली असता गोलीसिंग याच्या उशीखाली देशी बनावटीचे चालू स्थितीत रिव्हॉल्व्हर, ७ जिवंत काडतुसे, तसेच लोखंडी धारदार शस्त्र आढळून आले. पंचांसमक्ष सर्व शस्त्र पोलिसांनी जप्त केली.
संजुसिंग हा मध्य प्रदेशातून अशा प्रकारचे शस्त्र परभणीत आणून विक्री करीत असल्याची माहिती समोर आली. छाप्याच्या वेळी तो घरी आढळून आला नाही. सहायक पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर यांच्या तक्रारीवरून संजुसिंग जुन्नी व अमताबसिंग जुन्नी या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तीन बाल गुन्हेगार ताब्यात
नवा मोंढा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेले फरारी ३ बाल गुन्हेगार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गेल्या वर्षभरापासून हे तिघे पोलिसांना गुंगारा देत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर केले.
पळवून नेलेली मुलगी मुंबईतून ताब्यात
गंगाखेड येथून सोळा वर्षीय मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी सुनील पाखरेसह मुलीस मुंबईच्या विरार भागातून ताब्यात घेण्यात आले. पाखरे (नालेगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना) याने गंगाखेड येथील या मुलीस २० दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांचा माग काढत मुंबईच्या विरार भागातील कारगिल गल्लीतून दोघांनाही ताब्यात घेतले. सायबर सेलच्या माध्यमातून हे दोघे मुंबईत सापडले.