आरजीपीपीएल गोळीबार प्रकरण
दाभोळ येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पात गेल्या आठवडय़ात झालेल्या गोळीबारप्रकरणी युनिट प्रमुखांनी हल्लेखोराला ठार मारण्याचा दिलेला आदेश न पाळणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकल्पात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी हरीशकुमार गौड याने गेल्या १ मार्च रोजी रात्री गोळीबार करून दोघा सहकाऱ्यांना ठार मारले. तसेच स्वत: आणि पत्नीवरही गोळी झाडली. याप्रकरणी चालू असलेल्या तपासामध्ये असे उघडकीस आले आहे की, प्रकल्पातील गार्ड हॉस्टेलच्या मध्यभागी उभे राहून गौड याने अन्य सहकाऱ्यांवरही बंदूक रोखली होती, पण गोळीबार केला नव्हता. या वेळी त्याला ठार मारण्याचा आदेश युनिट प्रमुखांनी दिला होता. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता तेथे असलेल्या १२० सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये उच्च पातळीवरून तपास सुरू असून संबंधित रक्षक दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.