शेतकरी हवालदिल; संसार सावरण्यासाठी त्वरित नुकसानभरपाईची मागणी

अवकाळी पावसाने ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांमध्ये शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हाताशी आलेले भातपीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. मात्र, पंचनामे करण्यास नुकतीच सुरुवात झाल्याने नुकसानभरपाई मिळणार कधी, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्हातील एकूण ४२ हजार १९२ हेक्टर्स क्षेत्रातील भातपिकाचे नुकसान झाले आहे. यापैकी ३६ हजार २८६ हेक्टर जागेवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ६६ लाख इतकी रक्कम मिळावी असा अंदाज पंचनाम्याच्या अहवालामध्ये जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे, तर उर्वरित जागेवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

ठाणे जिल्ह्य़ात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोठय़ा प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण ५५ हजार २३५ हेक्टर जागेवर भातशेतीची लागवड करण्यात येते. जिल्ह्य़ात लागवड करण्यात येणाऱ्या गुजरात ११, वाडा कोलम आणि झिन्हीत या वाणांच्या तांदळाला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदा झालेल्या अवकाळी पावसात या भातशेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्य़ात एकूण ४२ हजार १९२ हेक्टर एवढय़ा जागेत भातशेतीचे नुकसान झाले असून त्यामध्ये ८१ हजार २४५ शेतकरी बाधित झाले आहेत.

शेतीपूरक व्यवसायांवर परिणाम

अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील सवा लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले असून, त्यापैकी जेमतेम २२ हजार शेतकऱ्यांकडे पीक विम्याचे कवच आहे. उर्वरित शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहेत. रब्बी पिकाची लागवड लांबणीवर पडली आहे. शेतीसोबत बागायतदार, मच्छीमार, दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन व शेतीपूरक व्यवसायांवर परिणाम झाला असून यावर आधारित हजारो कुटुंबांच्या जीवनसाखळ्यांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्य़ात एक लाख पाच हजार हेक्टर खरिपाची लागवड झाली होती व त्यामध्ये ७५ टक्के भातपीक होते. भातपीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भातपिकासह डोंगरी भागांत होणाऱ्या नागली व वरई या पिकांवरही परिणाम झाला आहे.

वसईत शेतीसह मत्स्य व्यवसायालाही फटका

अवकाळी पावसाने वसई परिसराला झोडपून काढले. त्यामुळे पारंपरिक भातशेती, फुलशेती, भाजीपाला व मत्स्य व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. वसईतील कामण, पोमण, चिंचोटी, टीवरी, राजवली, नागले, भाताने, शिरवली, चंदनसार बापाणए, जूचंद्र यांसह इतर ग्रामीण भागांत अंतिम टप्प्यात आलेल्या भातपिकांची मोठी नासाडी झाली आहे. दुसरीकडे वसईच्या बागायती पट्टय़ात अर्नाळा, आगाशी, रानगाव, भुईगाव यासह इतर भागांत लागवड करण्यात आलेल्या विविध फुलबागाही भिजून गेल्याने फुलांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. किनारपट्टी भागांत मच्छीमार बांधवांनी सुकण्यासाठी ठेवलेली मासळीही पावसाच्या पाण्यात भिजून गेल्याने कुजून खराब झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चिकू, सुपारीचे नुकसान

भिजलेल्या पिकामुळे भाताचा पेंढा व गवताची उपलब्धता यावर परिणाम झाला असल्याने दुग्ध व्यवसायासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय मिरची व भोपळी मिरची या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. तसेच भाजीपाला व फळ लागवडीवर अवकाळी पावसाने संकट उभे केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे चिकू व सुपारी गळून पडले आहेत.

(लेखन : नीरज राऊत, आशीष धनगर, कल्पेश भोईर)