दोन ट्रकमध्ये असलेला एक लाख ६० हजार रुपये किमतीचा तांदूळ शहर परिसरात गुरुवारी पहाटे पोलिसांनी जप्त केला. हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय आहे.
पहाटे चारच्या सुमारास नागलवाडी रोड भागात पोलीस गस्त घालत असताना त्यांना आयशर व टाटा ट्रक तारामतीनगरच्या पुढे जाताना दिसले. या वाहनांना अडवत चालकाकडे चौकशी केली असता रेशनचा माल असल्याचे तपासणी अधिकारी व पोलिसांच्या लक्षात आले. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांनी दोन्ही गाडय़ांची तपासणी केली असता प्रत्येकी ८० क्विटंलप्रमाणे एकूण १६० क्विंटल रेशनचा तांदूळ आढळला. जप्त केलेल्या तांदळाची किंमत एक लाख ६० हजार रुपये असून दोन्ही वाहनांची किंमत तीन लाख रुपये आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील वाहनचालक श्रीराम महाजन, पारोळा येथील हेमंत वाणी, सुभाष मोरे यांना अटक करण्यात आली आहे.