गेले तीन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्’ाातील शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेले पीक गमावण्याची वेळ आली असून भातशेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर त्याचवेळी मच्छिमार आणि आंबा बागायतदारही संकटात सापडले असून त्यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान येत्या चोवीस तासात अतिवृष्टीसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्या आली असून मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ऑक्टोबर हीट आणि त्याबरोबरच गेले तीन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. भातशेती कापून ती सुकविण्यासाठी घराच्या अंगणात शेतकऱ्यांनी आणली आणि शुक्रवारी रात्री अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या आनंदावर पावसाचे पाणी पडले. हातातेंडाशी आलेले पीक गमवावे लागल्याने त्याचे खऱ्या अर्थानें ‘दिवाळे’ निघाले आहे. तर या पावसामुळे आंब्याची मोहोर प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने आंबा बागायतदार चिंताग्रस्त अवस्थेत पडला आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश आंबा कलमांना पालवी फुटली असून बागायतदार थंडीच्या प्रतिक्षेत असताना त्यांच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे तर पावसाळी वातावरण आणि जोरदार वारे वाहत असल्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेला मच्छिमार रिकाम्या हाती बंदरात परतला आहे. एकूणच या अवकाळी पावसाने शेतकरी, मच्छिमार आणि आंबा बागायतदार यांना संकटांनी घेरले आहे. आजही दिवसभर पावसाळी वातावरण असून सुर्यनारायणाचे दर्शन जिल्हावासियांना झालेले नाही. दरम्यान येत्या चोवीस तासांत जोरदार वार्यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या रहिवाशांनी सावध राहण्याचे तसेच मासेमारीसाठी मच्छिमारांनी आपल्या बोटी सुमद्रात पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.