31 October 2020

News Flash

भातशेती नुकसानीचा कृषीपूरक व्यावसायांना फटका

दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून लागणाऱ्या पावळीचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा पालघर जिल्ह्यातून होतो. मात्र गेल्या वेळचा साठा आता उरला नाही.

|| निखिल मेस्त्री

दूध व्यावसायिकांसह गवत व्यापारी संकटात :- गेल्या महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्य़ातील बहुतांश भातशेतीचे नुकसान झाल्याने त्याचा फटका कृषिपूरक व्यावसायांनाही बसला आहे. पावसाने सुकी पावळी (भात काढल्यानंतर उरलेले गवत) ओली झाल्याने कुजली आहे. त्यामुळे ती दुभत्या जनावरांना देता येत नाही. दुभत्या जनावरांनी ओला चारा खाल्याने दुधात घट जाणवत असल्याची माहिती स्थानिक दूध व्यावसायिकांनी दिली. त्याशिवाय गवत व्यापाऱ्यांनाही यंदा गवत मिळत नसल्याने त्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे.

दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून लागणाऱ्या पावळीचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा पालघर जिल्ह्यातून होतो. मात्र गेल्या वेळचा साठा आता उरला नाही. त्यातच आता भातशेतीचे झालेले नुकसान लक्षात घेता पावळीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे दूध व गवत व्यावसायिकांवर संकट ओढवणार असल्याची चिन्हे आहेत.पालघर जिल्ह्य़ात ८० टक्के भातशेतीचे  नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हळवे, गरवे आणि निमगरवे या तिन्ही प्रकारच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. या पाश्र्वभूमीवर भातशेतीतून निघणाऱ्या पावळीवर अवलंबून असलेला दूध व्यावसायिक संकटात सापडणार आहेत. पावळी महागली तर त्याचा परिणाम दुधाच्या दरावर होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे गवत व्यापाऱ्यांना गवत मिळणार नसल्याने त्यांचेही नुकसान होणार आहे.

भिजलेल्या पावळीला बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ते काळपट पडून दीर्घकाळ साठवण्यास अयोग्य ठरतात. त्यामुळे पावळी शेतकरी आणि गवत व्यापाऱ्यांना योग्य दर मिळणार नाही. शिवाय त्याचा थेट प्रभाव दुग्ध व्यवसायावरही होणार आहे. ओली पावळी दुभती जनावरे खाण्यास ना पसंती दाखवत असल्याने दुधाचे प्रमाण घटते. त्यांच्यात पचनक्रियेसंदर्भातील पोटाचे विकार बळावतात.

माकुणसार भागात मोठय़ा प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. भातशेतीचे नुकसान झाल्यामुळे त्यांना याचा थेट फटका बसणार आहे. पावळी व गवताचे दर वाढले तर दुधाचा दरही वाढेल अशी भीती व्यक्त होत आहे.

स्थानिकांना रोजगार

दुभत्या जनावरांना ओला आणि सुका चारा आवश्यक असतो. फक्त ओला चारा खाल्यास त्यांच्यातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी होऊन दुधात घट होते. एक म्हैस प्रतिदिन पाच किलो सुका चारा म्हणून पावळी खाते. क्षमतेनुसार १२ ते १८ लिटर दूध देते. चिकूवाडीत ओला आणि सुका चारा वर्षभर मुबलक मिळतो. याकरिता  गुजरात राज्यातील दुग्ध व्यावसायिक प्राधान्य देतात. गुजरात, ठाणे, मुंबई येथे गवत निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना किमान तीन रुपये प्रतीकिलो पावळीला भाव मिळतो. एप्रिल ते मे या काळात गतवर्षी तो १५ रुपये झाला होता. भातपिकाचा एकूण उत्पादन खर्च कमी करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. तर शेतीसह गवत व्यवसाय केल्याने ती परवडणारी ठरते. तसेच स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:25 am

Web Title: rice farming hit businesses akp 94
Next Stories
1 ठाकरे कलादालनावरून शिवसेना पुन्हा आक्रमक
2 मच्छीमारांना अनुदानाची प्रतीक्षा
3 चिपळूण तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांना विंचूदंश 
Just Now!
X