01 March 2021

News Flash

जमीन भेगाळली, भात करपले

कोकणात तांदूळ उत्पादन घटण्याची चिन्हे, पाणीटंचाईचेही संकट 

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कोकणात तांदूळ उत्पादन घटण्याची चिन्हे, पाणीटंचाईचेही संकट 

कोकणात पूर्वार्धात धुवाधार बरसलेल्या पावसाने नंतर दीर्घकाळ दडी मारल्याने भातलागवडीखालील जमीन भेगाळू लागली आहे. परिणामी निमगरवे आणि गरवे प्रकारचे भाताचे पीक करपण्याची भीती आहे. अपुऱ्या पावसामुळे भाताच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. शिवाय, उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे.

रायगड

रायगड एकेकाळी ‘भाताचे कोठार’ असे वर्णन केल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्य़ात यंदा सुमारे एक लाख आठ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी कमी मुदतीचे म्हणजे हळवे भात काढणीच्या अवस्थेत आहे, मध्यम मुदतीचे म्हणजे निमगरवे आणि दीर्घ मुदतीचे गरवे भात दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. यापैकी हळव्या भातावर पावसाच्या दडी मारण्याचा फारसा दुष्परिणाम झाला नसला, तरी उरलेल्या दोन प्रकारच्या भाताच्या दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर परतीच्या पावसानेही जिल्ह्य़ातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान केले आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्य़ाची पावसाची दीर्घकालीन वार्षिक सरासरी ३३६४ मिलिमीटर आहे. यंदाच्या मोसमात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत तीन हजार मिलिमीटर पाऊस पडला. पण त्यानंतर पावसाचा जोर केवळ ओसरला नाही, तर अनेक ठिकाणी कडकडीत ऊन पडू लागले. सलग काही दिवस कोरडे गेले. त्यापुढील सव्वा महिन्यात फक्त ३६९ मिलिमीटर पाऊस पडला आणि त्याने यंदाची वार्षिक सरासरी (३३६९ मिमी) गाठली. मोसमाच्या उत्तरार्धात पाऊस गायब झाल्यामुळे भातपिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ात सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. त्यापैकी हळव्या भाताची कापणी सुरू झाली आहे.

या पिकाला गेल्या महिन्यात आणखी पावसाची आवश्यकता होती. परंतु तो न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या आठवडय़ापासून या पिकाची कापणी सुरू झाल्यानंतर जवळजवळ दररोज जिल्ह्य़ात कुठे ना कुठे पडणाऱ्या वादळी पावसामुळेही उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. जिल्ह्य़ातील हळव्या प्रकारच्या भाताच्या उत्पादनात सुमारे ५ ते १० टक्के घट झाली आहे. निमगरवे प्रकारच्या भाताच्या उत्पादनामध्ये सुमारे १० ते २० टक्के आणि सुमारे चार महिने मुदतीच्या गरवे प्रकारच्या भाताला अजिबात पाणी न मिळाल्यास २० टक्क्यांपेक्षाही जास्त उत्पादन घटण्याची भीती शेती संशोधक डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुमारे ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा भाताचे पीक घेण्यात आले आहे. त्यापैकी देवगड तालुक्यात पाण्याअभावी ४६५ हेक्टर क्षेत्रावरील भातपीक करपल्याचा अहवाल आला आहे. भाताच्या लोंब्या भरण्यास सुरवात झाली असतानाच पावसाने दडी मारल्यामुळे दाणे योग्य प्रकारे भरले न जाणे किंवा पीक करपणे असे  प्रकार घडले आहेत. तसेच काही ठिकाणी पिकावर कीड पडली आहे.

पाऊस अपुरा आणि विस्कळीत स्वरूपात पडल्याने कोकणातील तिन्ही जिल्ह्य़ांतील भातपिकाला काही प्रमाणात फटका बसला आहे. कमी पावसामुळे उन्हाळ्यातही तिन्ही जिल्ह्य़ांच्या ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 12:14 am

Web Title: rice production in maharashtra
Next Stories
1 कोल्हापूरचा मावळा युथ ऑलिम्पिकमध्ये चमकला, शाहु मानेला नेमबाजीत रौप्यपदक
2 पुढच्यावेळीही मीच मुख्यमंत्री असेन : देवेंद्र फडणवीस
3 मोदी, फडणवीसांची तुलना लघुशंका करणाऱ्या बाप-लेकाशी; अशोक चव्हाणांची जीभ घसरली
Just Now!
X