डहाणू तालुक्यात पावसानंतर हळव्या भातावर ‘राशी पवित्रा’ किडीचा प्रादुर्भाव

डहाणू : करोना संसर्ग टाळण्यासाठी लादलेल्या टाळेबंदीत मनुष्यबळाची जमवाजमव करून भातरोपांची लागवड. जुलै ते ऑगस्ट महिन्यांत झालेल्या पुरेशा पावसामुळे चांगले भात येण्याची आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना ऑक्टोबरच्या मध्यावधीस परतीच्या पावसाने दिलेला तडाखा आणि आता ‘राशी पवित्रा’ या हळव्या जातीच्या भातपिकाला उशिरा आलेल्या फुलोऱ्याला किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पावसाने नेलेले भात आता किड खाणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

गरव्या जातीचे बियाणे समजून ‘राशी पवित्रा’ या  हळव्या जातीच्या बियाणांची लागवड करण्यात आली होती. भातपिकाला उशिरा आलेला फुलोऱ्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे डहाणूतील वेती भागातील शेतकऱ्यांसमोर  दुसरे नवे संकट उभे ठाकले आहे.

त्यामुळे पिकाला फुलोरा आला, पण  दाणे भरले नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर डहाणू तालुका तक्रार निवारण समिती डहाणूने मौजे वेती  येथील गावात राशी पवित्रा बियाणे लागवड केलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

डहाणू तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भातशेतीवर अवलंबून आहे. यासाठी गरव्या जातीच्या बियाणाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.

दरम्यान गरव्या बियाणे संपल्याने कासा येथील कृषी केंद्रातून हळव्या जातीचे ‘राशी पवित्रा’ बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. गरव्या जातीच्या पिकापेक्षा हळव्या जातीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे मत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्र्ज्ञ डॉ. टी. एस. ढाणे यांनी मांडले.

डहाणूतील मौजे वेती भागात १२ हुन अधिक शेतकर्यांच्या शेतीतील भाताला फुलोरा आला. पण दाणेच न भरल्याने पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची  मागणी आहे.

शेतकऱ्यांनी बियाणेबाबत कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर कासाचे कृषी पर्यवेक्षक  संदीप संखे यांनी प्रत्यक्ष तक्रारदारांसोबत शेतीची पाहणी करून वरिष्ठांना अभिप्राय दिला. त्यानंतर गुरुवारी डहाणू तालुका तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी केली. या वेळी तालुका कृषी अधिकारी संतोष पवार, कोसबाड कृषी विज्ञान  केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाने, मानव अधिकार मिशनचे श्यामसुंदर चौधरी, मैनुद्दीन खान व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.