27 January 2021

News Flash

रेल्वेसेवा बंद असल्याने रिक्षा व्यवसायाला उतरती कळा

करोनच्या भीतीने प्रवाशांमध्ये घट

करोनच्या भीतीने प्रवाशांमध्ये घट

विरार : टाळेबंदीनंतर सध्या हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे, परंतु अजूनही अनेक व्यवसाय टाळेबंदीच्या आर्थिक नुकसानीच्या झळा सोसत आहेत. त्यात शासनाने अद्याप लोकल सेवा सुरू न केल्याने चाकरमान्यांवर अवलंबून असलेल्या  रिक्षा व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. करोनाच्या भीतीनेही रिक्षा प्रवासी संख्या प्रचंड घटली असल्याने रिक्षा व्यवसायात मंदी आली असून, रिक्षाचालक चिंतेत आहेत.

हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांचे टाळेबंदीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वसई-विरार शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रपाणावर आहे. ३० हजारहून अधिक रिक्षाचालक वसईत रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यामधील अनेक रिक्षाचालक भाडय़ाच्या घरांमध्ये वास्तव्य करीत असून, भाडय़ाच्या रिक्षा चालवितात. मागील पाच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले होते.  वसई-विरारमधील बहुतांश व्यवसाय हा कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांवर अवलंबून आहे. पण अद्याप रेल्वे सेवा सुरू झाली नसल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असल्याने पण त्यातही प्रवासी कोविड १९च्या भीतीने रिक्षात प्रवास टाळतात त्यामुळे ते खासगी वाहने, तसेच बसने प्रवास करत आहेत.

प्रवासी नसल्याने दिवसाचा धंदा निम्म्याहून कमी

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याशिवाय रेल्वे स्थानकात ये-जा करणारे इतर प्रवासी नाहीत. त्यामुळे शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील अनेक रिक्षा स्टॅंण्ड ओस पडले आहेत. लोकल सेवा बंद असल्याने रेल्वे स्थानकांपर्यंत रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी नसल्याने, तसेच बस थांबे जवळच असल्याने रिक्षाचा प्रवास टाळला जात आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. यामुळे रिक्षाचालकांचा दिवसाचा धंदा निम्म्यावर आला आहे. यामुळे पेट्रोलचा खर्च रिक्षाचे भाडे निघणे जिकिरीचे झाले आहे.  स्टॅण्डवर तासन्तास प्रतीक्षा करूनही प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालक चिंतेत आहेत.

कोविड अगोदर दिवसाला १००० ते १२०० रुपये दिवसाकाठी धंदा होत असे, आता दिवसभर रिक्षा चालवूनही केवळ ३०० ते ४०० रुपये मिळत आहेत. रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशीच नाहीत. यामुळे शासनाने रेल्वे सेवा सुरू करावी.

– जितेंद्र आकारे, रिक्षाचालक फुलपाडा, विरार

रिक्षाचालक मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात धंदा होत नसल्याने मुलांची शाळेची फी, घराचे भाडे, गाडीचा हप्ता आणि महिन्याचे राशन यांचा खर्च कसा करायचा, शासन आमच्याकडे कोणतेही लक्ष देत नाही.

– मंगेश पिळणकर, रिक्षाचालक, विरार    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:28 am

Web Title: rickshaw business hit badly due to local train close for common people zws 70
Next Stories
1 पश्चिम विदर्भात परतीच्या पावसाने नुकसान
2 मालेगाव महापालिकेत सर्वपक्षीय असंतोष
3 माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे काम रायगडमध्ये संथगतीने
Just Now!
X