शासकीय वाहनव्यवस्था अपुरी पडत असल्याने रिक्षाचालकांकडून मदतीचा हात

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णांची झपाटय़ाने वाढ होत असताना शासकीय रुग्णवाहिका सेवा रुग्णांच्या वाहतुकीसाठी अपुरी पडत आहे. परिणामी रुग्णांनी प्रतिरुग्णवाहिका म्हणून रिक्षांचा वापर करण्यास सुरूवात केली  आहे.  रिक्षा चालकांनीही समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊ करोना रुग्णांच्या  मदतीसाठी धाव  घेतली आहे.   त्यामुळे अनेक रिक्षा या प्रतिरुग्णवाहिका म्हणून रस्त्यावरून धावताना दिसू लागल्या आहेत.

पालघर जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिका प्रणालीअंतर्गत २९ रुग्णवाहिका कार्यरत असून त्यापैकी नऊ रुग्णवाहिका पूर्वी करोना रुग्णांच्या सेवेत  होत्या. वाढत्या रुग्णांची संख्या पाहून १४ एप्रिलनंतर या सर्व २९ रुग्णवाहिकामधून करोना रुग्णांना नेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबरीने आमदार निधीमधून जिल्ह्याला १५ रुग्णवाहिका उपलव्ध झाल्या आहेत. त्यापैकी अधिकतर रुग्णवाहिका सेवेत रुजू झाल्या आहेत.तरीही रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत.

जिल्ह्यात दररोज करोनाच्या रुग्ण संख्येत ६०० ते ९०० ने  वाढ होत असून संभाव्य रुग्णांची तपासणी करण्यासाठी संसर्ग झालेल्या रुग्णांना करोना काळजी केंद्रामध्ये किंवा रुग्णालयात दाखल करण्यासाठी तसेच  रुग्णांच्या एचआरसिटी चाचण्या करण्यासाठी तसेच इतर आजारी रुग्णांच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका व्यस्त राहत असल्याने रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत आहे.

संशयित करोना रुग्ण तसेच संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर अनेक नागरिक वेगवेगळ्या उपचारांसाठी व तपासणीसाठी रुग्णवाहिकेची वाट न बघता तीन आसनी रिक्षाने प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. अनेक रिक्षामध्ये चालक व प्रवासी यांच्यामध्ये प्लॅस्टिक फिल्म बसविण्यात असली तरी प्रवाशांची संवाद साधताना रिक्षा चालकांना करोना संसर्ग होण्याची भीती आहे. पालघर नगरपरिषदेसह इतर काही ठिकाणी रिक्षाचालकांची मोफत करोना तपासणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरीही रिक्षाचालकांच्या आरोग्याला धोका कायम आहे, असे असतानाही रिक्षाचालक सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णसेवा देत  आहेत.  इतर प्रसंगी रिक्षाचालकांचा अरेरावीपणा, त्यांच्याकडून घेतले जाणे अवास्तव भाडे व बेशिस्तीमुळे होणारी वाहतूक कोंडी इत्यादी विषय चर्चेचे ठरत असतात. मात्र या आजाराच्या संक्रमण काळात रिक्षा चालकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना दिलेला मदतीचा हात प्रशंसनीय ठरत आहे.

नियंत्रण कक्ष नाही

जिल्ह्यतील ग्रामीण भागांत साडेसहा हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. असे असतानाही जिल्ह्यतील रुग्णवाहिका सेवेसाठी समन्वय  नियंत्रण कक्ष किंवा रुग्णवाहिका मदत केंद्र कार्यरत नाही. त्यामुळे १०८ क्रमांकावर दूरध्वनी  करून रुग्णवाहिकेसाठी मागणी नोंदवावी लागते. अनेकदा दूरध्वनी केल्यानंतर  प्रत्यक्षात रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी तीन-चार तासांचा अवधी लागत असल्याने नागरिकांना खासगी रुग्णवाहिका किंवा रिक्षा वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

चालकांची नाराजी

पालघर शहरात सातशेहून अधिक रिक्षा आहेत. त्यातील फक्त दीडशे ते दोनशे रिक्षा सध्या कार्यरत आहेत. त्यात अधिक रिक्षा  रुग्णसेवा  देत आहेत. धोका पत्करून ही सेवा सुरू असतानाही स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.  राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान व धान्य रिक्षाचालकांना अजून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तसेच कर्जाचे हप्ते फेडणे कठीण जात आहे. असे असतानाही जीव धोक्यात घालून रिक्षा व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे रिक्षा युनियनचे प्रतिनिधी इमतियाज शेख यांनी सांगितले.