04 August 2020

News Flash

‘दूधदराबाबत सरकारचा निर्णय योग्यच’

दूध उत्पादकांच्या हाती विक्री केल्यानंतर केवळ १६ रुपये मिळत असल्याने ते हैराण आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे दर घसरले असल्याने निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने केलेली

| May 14, 2015 01:10 am

दूध उत्पादकांच्या हाती विक्री केल्यानंतर केवळ १६ रुपये मिळत असल्याने ते हैराण आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे दर घसरले असल्याने निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने केलेली उपाययोजना पुरेशी असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या फुलंब्री मतदारसंघासह राज्यात वेगवेगळय़ा ठिकाणी दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर टाकून आंदोलन केले. या पाश्र्वभूमीवर दुधाच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या बागडे यांनी मात्र सरकारचे या क्षेत्रातले निर्णय योग्य असल्याचे प्रशस्तिपत्र दिले.
सहकारी संस्थांना जे शेतकरी दूध घालतात, ज्यांचा स्निग्धांश ३.५ व एसएनएफ ८.५ असेल, अशा दुधास २२ रुपये ५० पैसे दर दिला जातो. मात्र, दूधउत्पादक सहकारी दूध संघाला दूध देत नाहीत. ज्या गावात पूर्वी सहकारी दूध सोसायटय़ा होत्या, त्या नाना कारणांनी बंद पडल्या. खासगी दूधउत्पादक संघाने विनाकारण भाव वाढवून ठेवले होते. आता त्यांचे दर कमी झाले आहेत. दरम्यान, सहकारी दूध सोसायटय़ा अवसायनात निघाल्या, बंद पडल्या. पुढील काही दिवसांत यावर उपाययोजना व्हावी असे वाटत असेल तर पुन्हा गावोगावी सहकारी दूध सोसायटय़ा स्थापन कराव्या लागतील, एवढा एकच मार्ग असल्याचे मत बागडे यांनी व्यक्त केले. मात्र, त्यांच्या या मताशी या क्षेत्रातील अनेक जण सहमत नाहीत. विशेषत: सरकारबरोबर नव्याने सहकार्य करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी म्हणाले, की गेल्या सहा महिन्यांपासून दूधउत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ८ रुपये भाव कमी मिळत आहे. या अनुषंगाने सरकारने लक्ष घालावे, यासाठी मी ओरडून ओरडून थकलो, मात्र कोणी लक्ष दिले नाही. १६ ते १७ रुपये मिळणारा दर परवडत नाही. कारण सध्या ५० किलो सरकी पेंडीसाठी ९०० ते १२०० रुपये मोजावे लागतात. केला जाणारा खर्च आणि मिळणारा भाव यात मोठे अंतर असल्याची टीका केली जाते. सरकारने यावर उपाययोजना म्हणून सहकारी दूध संघामार्फत दूध खरेदी प्रक्रिया सुरू ठेवली आहे. मात्र, ती अत्यल्प असल्याचे सांगितले जाते.
खासगी दूध संघानेच ही व्यवस्था अडचणीत आणली आहे. त्यासाठी नवीन मार्केटिंग हे सूत्र ठरवावे लागेल. त्यासाठी सहकारी सोसायटय़ा निर्माण कराव्या लागतील, असा सल्लाही बागडे यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 1:10 am

Web Title: right decision of government on milk rate
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूविक्रीत महिलाच आघाडीवर
2 अमरावती जिल्ह्यात पीककर्जाची व्याप्ती वाढवण्याचे आव्हान
3 किल्ल्या हरवल्याने ‘यशवंती’च्या फेऱ्या रद्द; उत्पन्नालाही फटका
Just Now!
X