21 March 2019

News Flash

दगडांचा सडा, जळालेल्या दुकानांचे अवशेष

मोतीकारंजा, राजाबाग परिसरातील चित्र

मोतीकारंजा, राजाबाग परिसरातील चित्र

खरेदी केलेले आंबे खराब निघाल्याच्या कारणावरून शहरातील औरंगपुरा परिसरात दोन गटांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिवारी दगड, विटांचा सडा, बाटल्यांच्या काचांचे फुटलेले तुकडे आणि जाळपोळीनंतर दुकाने, वाहनांचे सांगाडे, असेच भीषण दृश्य पाहायला मिळाले.

शहरातील शहागंज, मोतीकारंजा, संस्थान गणपती, राजाबाग, मंजूरपुरा, नवाबपुरा, चेलीपुरा, रोशन गेटसारख्या भागातील शंभरावर दुकाने जळून खाक झाली. शंभरपेक्षाही अधिक चारचाकी, दुचाकीची वाहने पेटवून देण्यात आली. आगीत धुमसत असलेली दुकाने, वाहने विझवण्यासाठी वेगवेगळय़ा भागांत सहा अग्निशमनच्या बंबांना पाचारण करावे लागले. शनिवारी दुपापर्यंत ही आग विझवण्याचेच काम सुरू होते. उपरोक्त भागात धूर, जळालेल्या दुकानांमधील वस्तूंची व वाहनांचे सांगाडे, दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीनंतर रस्त्यांवर अक्षरश: दगडगोटे व विटांच्या तुकडय़ांचा सडाच पडलेला होता. दंगेखोरांना आवरता आवरता थकून गेलेल्या पोलिसांचे ताफे दुकानांच्या जवळच्या सावलीत बसून होते. रात्रभर चाललेल्या दंगलीमुळे दुपारी पोलीस पेंगत होते. काही जण वाहनांतच चार घास खाताना दिसत होते. दंगल भागात घर असलेले मुकेश जयमल संचेती सांगत होते, की आज माझ्या मुलीचा वाढदिवस होता. रात्री बारा वाजता केक कापत असतानाच अचानकपणे घरावर दगडांचा मारा सुरू झाला. रॉकेल, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, मिरचीची पूड टाकलेल्या पाण्याच्या पिशव्या घराच्या दिशेने येऊ लागल्या. काहीच कळत नव्हते. नेमके कारणही कळत नव्हते. अचानकपणे काही जणांचे टोळके घरात शिरले. दाराची तोडफोड केली. टीव्ही फोडला. टेबलमध्ये मुलीला वाढदिवसाची भेट देण्यासाठी आणलेली सोन्याची चेन, रोख रक्कमही पळवण्यात आली.

मुकेश संचेती यांच्यासारख्या अनेक घरांचे मोतीकारंजा, राजाबाग, संस्थान गणपती, चेलीपुरा, रोशन गेटसारख्या भागात राहणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक व्यापाऱ्यांची दुकाने जाळपोळीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बंद दुकानांच्या आतील सांधीतून रॉकेल टाकून ती पेटवून देण्यात आल्यानंतर सकाळी केवळ काळेकुट्ट पडलेले अवशेष तेवढे दिसत होते. आगीमुळे संचेती यांच्या घराजवळच्या पिंपळाचा बुंधाही जळालेला होता. संस्थान गणपतीला लागूनच असलेल्या इमारतीतील खालचे दुकान व वरील भागातील घरही जळून खाक झाले होते. १९८६ नंतर तब्बल ३२ वर्षांनी असे भीषण दंगलीनंतरचे चित्र अनुभवल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले.

दंगलीचे परिणाम शहरातील इतरही भागांतही उमटले असून, बहुतांश व्यापाऱ्यांनी भीतिपोटी आपली दुकाने बंदच ठेवली होती. शहरात अघोषित कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र होते.

First Published on May 13, 2018 12:53 am

Web Title: riot in aurangabad