दावल मलिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमणाचा वाद

कर्जत येथील दावल मलिक देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या तौसिफ शेख उर्फ सूर्याभाई या युवकाचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद  कर्जतमध्ये उमटले असून मुस्लिम समाजाच्या आवाहनानुसार कर्जत शहरात कडकडीत बंद  पाळण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

कर्जतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये सर्वपक्षीय आणि जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादासाहेब सोनमाळी, अंबादास पिसाळ,  यांच्यासह ४ ते ५ हजार मुस्लिम बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांना पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचाही आरोप अनेकांनी यावेळी केला.

दोन वेळा रस्त्यावर नमाज

तौसिफ याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत,  केलेले अतिक्रमण तातडीने काढावे, मयताच्या नातेवाइकांना २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य़ मिळावे आणि कुटुंबातील एकाला नोकरी मिळावी या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता.

यावेळी आंदोलक आणि अधिकारी यांच्यात  चर्चा झाली मात्र निर्णय झाला नाही. यावेळी नमाजाची  वेळ झाल्याने सर्व आंदोलकांनी छत्रपती चौकामध्ये रस्त्यावर दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी सव्वापाच वाजता असे दोन वेळा नमाज पठण केले.

पिंजारी यांना धक्काबुक्की

आंदोलन सुरू असताना आंदोलनाच्या ठिकाणी कर्जत नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी साजीद पिंजारी आले होते. यावेळी  नगरपंचायतीची भूमिका मांडत असताना संतप्त युवकांनी गोंधळ घालत त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये पिंजारी यांना बाहेर नेण्यात आले.

 अतिक्रमणावर हातोडा

आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्याने प्रशासनाने दुपारी अडीच वाजता पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रणावर हातोडा फिरवला. यावेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.