२.७४ मीटर उंचीच्या लाटा धडकणार * किनारपट्टीवरील गावांना अतिदक्षतेचा इशारा
मान्सून सुरू होण्यापूर्वीच समुद्राला आलेल्या उधाणाचा तडाखा मांडवी, मिरकरवाडा, राजिवडा, भाटी व जाकीमिऱ्या, गणपतीपुळे, हर्णे, दाभोळ आदी किनारपट्टीवरील गावांना बसला आहे. गुरुवारी समुद्राने उग्ररूप धारण केल्याने लाटांचा जोर आज तिसऱ्या दिवशीही कायम राहिला असून सुमारे २.६७ मीटर उंचीच्या लाटा येथील मांडवी किनाऱ्याला धडकल्या व त्यामुळे जेटीच्या खालून तडा गेला आहे.
दरम्यान ज्येष्ठ पौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्या (रविवार) या महिन्यातील सर्वात मोठे उधाण येणार असून दुपारी १२.१५ वा.पासून २.७४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. गुरुवारपासून समुद्राने रुद्रावतार धारण केल्याने किनारपट्टीवरील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हायटाइडच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मांडवी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिवलकर व त्यांचे सहकारी लोकांच्या संरक्षणासाठी समुद्रकिनारी जातीनिशी उपस्थित आहेत.
समुद्राने गेले तीन दिवस रौद्ररूप धारण केल्याने किनारपट्टीवरील लोकांनी सावध राहावे, तसेच मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा दक्षतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर येणाऱ्या सर्वोत्तम भरतीमध्ये लाटांची उंची २.६० मीटरपेक्षाही अधिक असते; परंतु पावसाळ्यात येणाऱ्या भरतीला वादळी वाऱ्याची सोबत असते. त्यामुळेच ही भरती अधिक धोक्याची मानली जाते. यामुळे किनारपट्टीवरील रहिवाशांच्या जीविताला धोका असतो. जून महिन्यातील ज्येष्ठ पौर्णिमेपासून समुद्र खवळायला सुरुवात होते. बुधवारी (११ जून) सर्वोत्तम भरतीच्या वेळी लाटांची उंची २.४० मीटर एवढी होती, तर गुरुवारी (१२ जून) सकाळी १०.५३ वाजता आलेल्या भरतीच्या वेळी लाटांची उंची २.५५ मीटर होती. शुक्रवारी (१३ जून) दुपारी ११.३४ वाजता आलेल्या भरतीच्या वेळी लाटांची उंची २.६७ मीटर होती, तर आज (१४ जून) दुपारी ३.१५ वा. आलेल्या सर्वोत्तम भरतीच्या वेळी लाटांची उंची २.७४ मीटर एवढी होती.
तर या महिन्यातील सर्वात मोठी भरती उद्या (रविवार, १५ जून) असून त्याची वेळ दुपारी १२.५६ वा.ची आहे. या वेळी लाटांची उंची २.७४ मीटर राहणार आहे. तसेच २८ जूनला २.६८ मीटर उंचीच्या, तर १४ जुलैला २.७९ मीटर, २७ जुलैला २.६४ मीटर आणि १२ ऑगस्टला सर्वात मोठी भरती असून त्या दिवशी २.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
रत्नागिरीत उधाणाच्या भरतीने थैमान घातले असून काल (शुक्रवार) मांडवी (गेट वे ऑफ रत्नागिरी), मिरकरवाडा, राजिवडा, गणपतीपुळे किनाऱ्यावर उसळलेल्या उत्तुंग लाटांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या लाटांचा जबरदस्त तडाखा मांडवी जेटीला बसला असून जेटीच्या खालच्या भागाला तडे गेले आहेत, तर मिरकरवाडा बंदरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमार बोटी वादळी वारा व लाटांच्या तडाख्यामुळे एकमेकांवर आदळल्याने अनेक बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दापोली, गुहागर, राजापूर तालुक्यातील किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी उधाणाचे पाणी शिरल्याने घबराट पसरली आहे.
भाटीमिऱ्या बंधाऱ्याला भगदाड
भाटी व जाकीमिऱ्या गावांची समुद्रापासून होणारी धूप थांबविण्यासाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची समुद्राला आलेल्या उधाणामुळे पार धूळधाण उडवून दिली असून, भाटीमिऱ्याच्या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी भरवस्तीत शिरून मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्यांचे जीव टांगणीला लागले असून गेली अनेक वर्षे जीव मुठीत घेऊन रात्रभर जागता पहारा देण्यापासून आपली कधी तरी सुटका होईल का, असा सवाल भाटीमिऱ्यातील लोक करीत आहेत.