27 September 2020

News Flash

भाजपला बदनामीचा धोका!  

कलंकित नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे अण्णा हजारे यांचा इशारा

(संग्रहित छायाचित्र)

संजय वाघमारे

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना भाजपने प्रवेश देणे योग्य नाही. कलंकितांच्या प्रवेशामुळे या पक्षाला बदनामीचा धोका आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

भाजपमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात महाभरती सुरू आहे. माजी मंत्री, उस्मानाबाद सहकारी बँक, तेरणा सहकारी साखर कारखाना गैरव्यवहारातील आरोपी पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षांतील अनेक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर  हजारे यांनी सध्याच्या घाऊक पक्षांतराबाबत भाष्य केले.

‘राजकारणात भ्रष्ट नेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे नेते आपल्या भ्रष्टाचार आणि गुन्ह्य़ांवर पांघरूण घालण्यासाठी नेहमीच सत्तेच्या वळचणीला जातात. आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी नेहमीच सत्तेच्या आश्रयाला जाणारे माजी मंत्री सुरेश जैन हे याचे उत्तम उदाहरण आहे. आपले कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार झाकण्यासाठी जैन यांनी तीनदा पक्षांतर केले. त्यामुळे घरकुल घोटाळ्यात त्यांच्यावरील कारवाईला मोठा विलंब झाला’, असे हजारे म्हणाले.

‘सत्तेच्या आश्रयाने राजकारणातील गुन्हेगारी फोफावली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेले भ्रष्ट, गुन्हेगार राजकारणी अस्वस्थ आहेत. आपल्यावरील गुन्ह्य़ांवर पांघरूण घालण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यातूनच सत्ताधारी पक्षांत प्रवेश होत आहेत. मात्र, भाजपने अशा नेत्यांना प्रवेश देणे योग्य नाही. कलंकितांना पक्षप्रवेश देण्याचे सत्र असेच कायम राहिले तर पक्ष बदनाम होण्यास वेळ लागणार नाही’, असा इशारा हजारे यांनी भाजपला दिला.

देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले आहे. भ्रष्ट, गुन्हेगार व्यक्तींना पक्षात प्रवेश देणे मुख्यमंत्र्यांना कदाचित रुचत नसावे. मात्र केंद्रीय पातळीवरून निर्णय होत असेल तर त्यांचाही नाइलाज होत असावा, असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

‘मतदारांनी धडा शिकवावा’

गुन्हेगार आणि भ्रष्ट व्यक्तींना सत्ताधारी किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास मतदारांनी त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन हजारे यांनी केले. देशात नवमतदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासह सर्वच मतदारांनी विचारपूर्वक चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक, समाजहिताचे काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावे. कोणत्याही पक्षातील अशा उमेदवारांना निवडून दिल्यास देशात लोकशाही बळकट होईल, असा आशावाद हजारे यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 1:43 am

Web Title: risk of defamation to bjp says anna hazare abn 97
Next Stories
1 महापुरातून सावरलेल्या सांगलीकरांकडून गणेशाचे स्वागत
2 ‘लोकसभे’च्या वेळी स्वकियांनीच दगा दिल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश – धनंजय महाडिक
3 विरोधकांकडे उमेदवारच नसल्याने युतीसाठी ‘अब की बार २८८ पार’
Just Now!
X