केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सुरू करण्यात आलेली उपनगरी रेल्वे सेवा अपुरी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोनाकाळातील सुरक्षित अंतराचा नियम पाळणे प्रवाशांना अशक्य झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे उपनगरी रेल्वेगाडय़ांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

सुरुवातीला गाडय़ांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करणे शक्य होते. गेले काही दिवस अत्यावश्यक सेवांसह बँक कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गाडय़ांमधील गर्दी वाढली आहे.

महिलांच्या अडचणींत भर

उपनगरी गाडय़ांमध्ये महिलांसाठी मर्यादित डबे आहेत. या डब्यांमध्ये महिला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आता उभे राहण्यासाठीही त्यांना कसरत करावी लागत आहे. कामाच्या वेळेत तर डब्यांत मोठी गर्दी उसळत आहे. विरारमध्ये राहणाऱ्या मानली खोट या मुंबईतील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहेत.

सकाळी विरारहून सुटणाऱ्या गाडीतून त्या मुंबईकडे रवाना होतात. परंतु विरार स्थानकातच प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने डब्यात उभे राहण्यासही जागा होत नाही, असे त्यांनी सांगितले.

बनावट ओळखपत्रांसह घुसखोरी

अत्यावश्यक सेवेत काम करतो असे सांगून काही जण बनावट ओळखपत्र तयार करून घेत आहेत. असे प्रवासी सध्या उपनगरी रेल्वेगाडय़ांमध्ये घुसत आहेत. अशा प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचशे रुपयांत असे बनावट ओळखपत्र तयार करून मिळते. त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मीरा रोडमध्ये एका महिलेवर आणि अंधेरी येथे एका व्यक्तीवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.