निवडणूकपूर्व युती असलेल्या भाजपा-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेने घेतलेली वेगळी भूमिका आणि कोणताही राजकीय पक्ष १४५ हा जादुई आकडा गाठण्यात सफल न ठरल्याने राज्यात अखेर मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवटीवर अनेकांनी आपलं मत मांडलं असताना अभिनेता रितेश देशमुखनेही प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश म्हणाला, ”राज्यातील राजकीय वातावरण काय आहे हे मला माहित आहे. भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राष्ट्रवादी व काँग्रेस हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार होते. महायुतीला बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्दयांवर भाजपासोबत जाण्याचे टाळले. कोणताही राजकीय पक्ष संख्याबळाचा निकष पूर्ण करु शकत नसल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी जरी राजकीय असली तरी या देशाचा एक नागरिक म्हणून मला पाच वर्षांचे स्थिर सरकार हवे आहे.”

रितेशचे बंधू अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढवली होती. धीरज यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून १.२१ लाख मतांनी त्यांचा विजय झाला. दुसरीकडे अमित देशमुख यांचा लातूर शहर मतदारसंघात ४२ हजार मताधिक्याने विजय झाला.