News Flash

नदीजोड प्रकल्पाचे भिजत घोंगडे

जळगाव जिल्ह्य़ात २००७ ते २०१० या काळात नदीजोड प्रकल्पाचा गाभा क्षेत्रातील योजनेत समावेश करण्यात आला होता

(संग्रहित छायाचित्र)

जितेंद्र पाटील

दुष्काळी तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी राज्य शासनाने २००५ मध्ये जिल्ह्य़ात नदीजोड प्रकल्प राबविला होता. त्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे सव्वाशे गावांमधील सुमारे आठ लाख नागरिकांचा पाण्याचा प्रश्नही सुटला होता. परंतु, नंतरच्या काळात राजकीय अनास्थेपोटी नदीजोड प्रकल्पाकडे सोयीस्कर पाठ फिरविण्यात आली आणि प्रगतिपथावरील, प्रस्तावित कामे थांबली. तापी, गिरणेचे पावसाळ्यात वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला चालना देण्याकरिता खास निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत नद्यांमधून वाहून जाणारे पुराचे पाणी कालवे, नाले, ओढे यांच्या माध्यमातून फिरवून लहान, मोठे सिंचन प्रकल्प पाण्याने भरण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २००५-०६ मध्ये जळगाव जिल्ह्यात हाती घेण्यात आला होता. गिरणा नदीवरील पांझण डावा, जामदा डावा, जामदा उजवा, निम्न गिरणा कालव्याच्या माध्यमातून बोरी, म्हसवे, भोकरबारी यासह ७०० लहान, मोठय़ा प्रकल्पांचे पुनर्भरण करण्याची योजना प्रत्यक्षात आणण्यात आली होती. त्यामुळे १६ हजारपेक्षा जास्त विहिरींचे पुनर्भरणदेखील शक्य झाले होते. या शिवाय नदीजोडमुळे सुमारे ४४८६ दशलक्ष घनफूट पाण्याची प्रत्यक्ष साठवण झाली होती. कायम दुष्काळीच्या छायेखाली वावरणाऱ्या पारोळा, एरंडोल, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पाचोरा तालुक्यांना नदीजोडचा विशेष फायदा झाल्याचे निदर्शनास आले. अशा या नावीन्यपूर्ण नदीजोड उपक्रमाची उपयुक्तता दिसून आल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांत वाया जाणारे जास्तीचे पाणी कोरडय़ा नदी, सिंचन प्रकल्पांमध्ये सोडण्याची योजना दर वर्षी राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २००७-०८ वर्षांत २१ कोटींची तरतूदही करण्यात आली. नदीजोड प्रकल्पाची स्थिती आणि त्याचा लाभ होतोय किंवा नाही हे पाहण्यासाठी केंद्र शासनाकडून एक समिती जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आली होती. या समितीने नदीजोड प्रकल्पाची दखल घेऊन समाधान व्यक्त केले व तसा अहवाल केंद्राकडे सादरसुद्धा केला.

जळगाव जिल्ह्य़ात २००७ ते २०१० या काळात नदीजोड प्रकल्पाचा गाभा क्षेत्रातील योजनेत समावेश करण्यात आला होता. या काळात जिल्हा नियोजन समितीकडून २८ कामांना २४ कोटी ३८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या कामांपैकी २२ कामांना सुरुवातही झाली होती, तर ११ कामे पूर्ण झालेली होती. २०११ मध्ये ही योजना गाभा क्षेत्रातून वगळण्यात आल्याने जिल्हा वार्षिक नियोजनातून वगळली गेली. त्यामुळे नदीजोडची कामे बंद पडली. काही वर्षांनंतर राज्य शासनाने पुन्हा गाभा क्षेत्रात समावेश केल्याने नदीजोड प्रकल्पाचा जिल्हा वार्षिक आराखडय़ात समावेश करता येऊ  शकतो, हे लक्षात घेऊन लघू पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून त्याकडे लक्ष वेधले. नदीजोड प्रकल्प राज्य शासनाने बिगर गाभा क्षेत्रात टाकल्याने पाच वर्षे दुर्लक्षित राहिला होता. राज्य शासनाने पुन्हा त्याचा गाभा क्षेत्रात समावेश केल्याने या प्रकल्पास परत गती मिळण्याची आशा निर्माण झाली. या प्रकल्पाची बंद पडलेली ११ कामे पुन्हा सुरू करण्यासाठी १३ कोटी ८३ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. परंतु, नदीजोडचे घोंगडे भिजत पडले, ते आजतागायत कायमच आहे. नारपार, दमणगंगेच्या माध्यमातून नदीजोडसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यातून जळगाव जिल्ह्य़ातील प्रलंबित नदीजोडच्या कामांना चालना देण्याची मागणी होत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही त्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नदीजोड प्रकल्प बारगळल्यामुळे गिरणा, तापी नद्या दुथडी भरून वाहत असताना अनेक उपनद्या आजही कोरडय़ाठाक पडल्या आहेत. भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून, अनेक गावे भर पावसाळ्यात टंचाईशी दोन हात करीत आहेत.

नदीजोड प्रकल्पाचा एक भाग म्हणून तापीवरील पाडळसरे प्रकल्पात अडविण्यात आलेले पाणी गिरणा तसेच बोरी, अंजनी नद्यांमध्ये सोडण्याची योजना प्रस्तावित आहे. तसेच वरखेडे लोंढे प्रकल्पाचे पाणी तितूर आणि अन्य नद्यांमध्ये कालव्याद्वारे सोडण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम होईल.

– उन्मेष पाटील (खासदार, जळगाव)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:11 am

Web Title: river connection project drought abn 97
Next Stories
1 सोपल यांच्या निर्णयाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला फटका
2 विलास तरे यांच्या सेना प्रवेशाने निष्ठावंत नाराज
3 भंडारा-गोंदियात उमेदवारी निश्चित करताना कस
Just Now!
X