नदीजोड प्रकल्प ही भारत तोडण्याची योजना असून हा प्रकल्प कधीही यशस्वी होणार नसल्याची टीका जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली. राज्यांमधील पाणी वाटपाचे वाद न्यायालयास अद्याप सोडविता आले नसताना नदीजोड प्रकल्पांमुळे देशात मोठे वाद निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गत दोन वर्षांत ठेकेदारांचा शिरकाव झाल्यामुळे पहिल्या वर्षीच्या तुलनेत त्या योजनेची यशस्वीता घटल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

येथील शहिद स्मृती समितीतर्फे आयोजित जल परिषदेत राजेंद्र सिंह बोलत होते. देशातील मोठय़ा नद्यांच्या प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त करत आता युवकांनी नदी संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. जल संवर्धन आणि जलसाक्षरता या विषयी माहिती देत पाणीचक्र आणि पीकचक्र यांची सांगड घालुन पाण्याचा अधिक उपयोग करुन त्याच्या जलपुर्नभरणाची गरज अधोरेखीत केली.

शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’मुळे राज्यातील दुष्काळाचे चित्र पालटत असतांना दोन वर्षांपासून या अभियानात ठेकेदारांचा शिरकाव झाल्याने त्यास ग्रहण लागले आहे. गेल्या दोन वर्षांत कामांचा वेगही मंदावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ठेकेदारांना दूर ठेवत लोकसहभाग वाढविल्यास या अभियानातून दुप्पट फलश्रुती मिळेल, असा विश्वास राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला. नदीजोड प्रकल्प म्हणजे भारत तोडण्याची योजना असुन तो आतापर्यत कुठेही यशस्वी झालेला नाही. विविध प्रकल्पांचे दाखले देत न्यायालयही छोटय़ा प्रकल्पांच्या पाणी वाटपाचे वाद मिटवू शकले नाही. नदीजोड प्रकल्पांमुळे देशात मोठे विवाद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नदीजोड प्रकल्पाऐवजी भारताचे लोक नदीला जोडले तर पूर आणि दुष्काळासारख्या स्थितीवर सहज मात करता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रतिभा शिंदे, चैत्राम पवार, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी आदींसह पर्यावरण प्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.